पालिकेवर टीका करत फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:07 IST2021-04-23T04:07:57+5:302021-04-23T04:07:57+5:30
गुन्हा दाखल होताच ट्वीटरद्वारे मागितली माफी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्ण जिवंत असतानाही त्याला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन ...

पालिकेवर टीका करत फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा
गुन्हा दाखल होताच ट्वीटरद्वारे मागितली माफी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्ण जिवंत असतानाही त्याला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेल्याचा दावा एका व्हिडिओतून करण्यात आला होता. हा व्हिडिओ शेअर करताना संबंधिताने मुंबई महापालिकेवर आरोप केले. चौकशीत हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगत, तो व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रणिता टिपरे यांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला कोरोना किटमध्ये बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले. स्मशानभूमीत आणल्यानंतर तो रुग्ण जिवंत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. याबाबत सुरेश नाखुआ यांनी ट्वीट करत, ‘एक जिवंत माणूस बीएमसीने स्मशानभूमीत नेला. मला वाटते की महावसुली आघाडी सरकारचे स्मशानभूमीतून काही महावसुलीचे टार्गेट असेल’, असे त्याखाली नमूद केले होते.
नाखुआ यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवरून त्याला उत्तर देण्यात आले. ‘सर, आपल्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानुसार आम्ही तुम्हाला विनंती केली की, या व्हिडिओचे मूळ आणि सत्यता तपासून पाहा. मात्र, तुम्हालाही या व्हिडिओचे मूळ स्थान आणि सत्यतेबद्दल खात्री नव्हती. पुढे संबंधिताने वरिष्ठांना माहिती देणार असल्याचे सांगितले तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधून याबाबत विचारणा केली तेव्हाही वेगवगेळी कारणे देत माहिती टाळण्यात आली. त्यानंतर प्रतिसाद देणे बंद केले.
अखेर पालिकेने मुंबईतील स्मशानभूमीत अशी कुठली घटना घडली का? याबाबत चौकशी केली. मात्र त्यातही काही सापडले नाही. चौकशीत तो व्हिडिओ फेक असल्याचे स्पष्ट होताच तो अहवालही नाखुआ यांना व्हॉट्सॲप करण्यात आला.
अखेर संबंधित व्यक्तीने जाणीवपूर्वक व्हिडिओची खातरजमा न करता तो शेअर करत, पालिकेची बदनामी केली. त्यात नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ५४ अन्वये अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेने ट्विट करत याबाबत माहिती दिली.
* गुन्हा दाखल होताच जाहीर माफी
गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दुजोरा दिला. तसेच यानंतर संबंधित व्यक्तीने जाहीर माफीदेखील मागितल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
....