लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बोरिवलीत मुंबई क्रिकेट असोसिएशचे आधारस्तंभ शरद पवार यांच्या नावाने क्रिकेट संग्रहालय बांधण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी सचिन तेंडुलकरच्या नावाने बोरीवलीत क्रिकेट संग्रहालय असावे, या जुन्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिन तेंडुलकरच्या नावाने कांदिवलीत भव्य क्लब बांधला आहे. त्यासोबतच बोरिवलीत क्रिकेट संग्रहालय बांधल्यास उपनगरात क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. मुळात आपण गेल्या १५ वर्षापासून या संग्रहालयासाठी प्रयत्नशील आहोत. आमदार असताना यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री, मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्रही लिहिले. तेव्हापासून ही मागणी प्रलंबित आहे, याकडेही गोपाळ शेट्टी यांनी असोसिएशनचे लक्ष वेधले.
शरद पवारांच्या नावाला आक्षेप नाही, पण १५ वर्षांपूर्वीच्या माझ्या मागणीचा पुनर्विचार झाला पाहिजे, असे शेट्टी म्हणाले.