शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कमळाचा सुरुंग
By Admin | Updated: October 20, 2014 03:59 IST2014-10-20T03:59:58+5:302014-10-20T03:59:58+5:30
ठाणे शहर मतदारसंघावरील शिवसेनेचा भगवा अखेर उतरला असून त्या ठिकाणी भाजपाचे कमळ तब्बल २९ वर्षांनी फुलले आहे

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कमळाचा सुरुंग
ठाणे : ठाणे शहर मतदारसंघावरील शिवसेनेचा भगवा अखेर उतरला असून त्या ठिकाणी भाजपाचे कमळ तब्बल २९ वर्षांनी फुलले आहे. भाजपाचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा तब्बल १२ हजार ८५५ मतांनी पराभव केला. आघाडी तुटल्याचा फटका काँगे्रस, राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादीला तिसऱ्या आणि काँग्रेसला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. मनसेच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात असलेल्या ३ लाख २२,१७४ मतदारांपैकी १ लाख ८२ हजार ३८९ मते निर्णायक ठरली. यापैकी या मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात होते. परंतु, खरी लढत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातच होती. सकाळी ८.३० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासून केळकरांनी आघाडी घेतली. या वेळी एकूण २६ फेऱ्या झाल्या असून यामध्ये भाजपाचे संजय केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली. शिवसेनेचे पराभूत उमेदवार रवींद्र फाटक यांना ५८ हजार २९६ मते मिळाली. राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना २४ हजार ३२०, काँग्रेसचे नारायण पवार यांना १५ हजार ८८३ आणि मनसेचे निलेश चव्हाण यांना केवळ ८,३८१ मते मिळाली. २००९ च्या निवडणुकीत सेनेच्या राजन विचारे यांचा केवळ २२०० मतांनी विजय झाला होता. परंतु, नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती असल्याने विचारे यांना या मतदारसंघातून घवघवीत यश मिळाल्याचे दिसले. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुती तुटल्याने सेना आणि भाजपाची मते विभागली गेली. परंतु, लोकसभेत विचारे यांना भाजपाची जेवढी मते पडली होती, तेवढी मते केळकर यांना सरसकट मिळाली. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पॉकेटमध्येही केळकरांनी निर्णायक आघाडी घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसमधून आयात केलेल्या फाटकांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे निष्ठावंत नाराज झाले होते. ही नाराजी जाहीरपणे प्रकटही झाली होती. त्यामुळे निष्ठावंतांना आपलेसे करण्यासाठी शिवसेनेच्या श्रेष्ठींनी नाराजांना पदांची खैरात केली होती. तरी निष्ठावंतांनी दाखविलेल्या नाराजीचा फटका फाटकांना बसला.
दरम्यान, सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्या फेरीतच केळकरांनी आघाडी घेतली. त्यानंतर, पहिल्या चार फेऱ्यांपर्यंत घोडबंदर आणि आजूबाजूच्या पट्ट्यातील यंत्रे उघडण्यात आली.
या पट्ट्यात शिवसेनेचे वर्चस्व असतानासुद्धा त्या ठिकाणी केळकरांनी सुमारे ६ हजारांची आघाडी घेतली. त्यानंतर, पाचव्या आणि सहाव्या फेरीत फाटकांनी ही लीड काहीशी कमी केल्याचे दिसून आले. परंतु, पुन्हा सातव्या फेरीपासून केळकरांनी ४ हजारांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे आठव्या आणि नवव्या फेरीत राबोडी आणि आजूबाजूच्या परिसरातील मतांची मोजणी सुरू झाली. ही वस्ती मुस्लिम होती. त्या ठिकाणीदेखील केळकरांनी आघाडी घेतली. अखेर, फाटकांना केळकरांचे लीड काही तोडता आलेच नाही.