१५ दिवसांत युरियाचा दीड लाख मेट्रिक टन बफर साठा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:06 IST2021-05-13T04:06:23+5:302021-05-13T04:06:23+5:30

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे विभागाला निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खरीप हंगामासाठी ऐनवेळी खतांची मागणी वाढल्यास तुटवडा जाणवू ...

Create 1.5 lakh metric tonne buffer stock of urea in 15 days | १५ दिवसांत युरियाचा दीड लाख मेट्रिक टन बफर साठा तयार करा

१५ दिवसांत युरियाचा दीड लाख मेट्रिक टन बफर साठा तयार करा

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे विभागाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खरीप हंगामासाठी ऐनवेळी खतांची मागणी वाढल्यास तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर खत पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टाॅक तयार केला जात आहे. १५ दिवसांत याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी दिले. राज्यात यंदा प्रथमच दीड लाख मेट्रिक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे.

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषिमंत्र्यांनी मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दरसोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंद दीड लाख मेट्रिक टन युरियाचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले.

कंपन्यांनी खत पुवठ्याचे जे वेळापत्रक केले आहे त्यानुसार त्याचा पुरवठा होतो की नाही, याची क्षेत्रीय यंत्रणांनी खातरजमा करावी. पुढील दोन महिने अलर्ट राहून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी दिले. यावर्षी केंद्र शासनाकडून ४२ लाख ५० हजार मेट्रिक टन खत मंजूर केले आहे. सध्या राज्यात २२ लाख ५६ हजार मेट्रिक टन साठा शिल्लक असून त्यामध्ये युरिया ५ लाख ३० हजार मेट्रिक टन, डीएपी १ लाख २७ हजार मेट्रिक टन, संयुक्त खते ९ लाख ७२ हजार मेट्रिक टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध आहे.

........................................

Web Title: Create 1.5 lakh metric tonne buffer stock of urea in 15 days