‘आबा’ नावाची क्रेझ अस्ताला जाताना...

By Admin | Updated: February 17, 2015 02:06 IST2015-02-17T02:06:26+5:302015-02-17T02:06:26+5:30

कधी २६/११चा अतिरेक्यांचा हल्ला असायचा, तर कधी आबांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी साजरी केल्याची बातमी असायची...

A crazy name called 'aaa' ... | ‘आबा’ नावाची क्रेझ अस्ताला जाताना...

‘आबा’ नावाची क्रेझ अस्ताला जाताना...

हम आह भी भरते हैं
तो हो जाते हैं बदनाम,
वो कत्ल भी करते हैं
तो चर्चे नही होते...
हा शेर आबा अनेकदा ऐकवायचे. निमित्त काहीही असायचं... कधी २६/११चा अतिरेक्यांचा हल्ला असायचा, तर कधी आबांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी साजरी केल्याची बातमी असायची... यंदा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला पाच-सहा दिवस राहिले असताना आबांनी प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि गदारोळ उठला. त्यापूर्वी अतिरेकी हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरोंमें छोटे छोटे हादसे होते हैं’ हे त्यांचं विधान वादग्रस्त बनलं होतं. त्या विधानाचा विपर्यास कसा झाला, हेही आबा अनेकदा सांगायचे.
संभाषण चातुर्य आणि बोलण्यातली आपुलकी हे गुण आईकडून आबांकडे आलेले. त्यांचं वक्तृत्व हा महाराष्ट्रभर अनेकांचा अप्रूपाचा विषय ठरला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी घोटून-घोटून वक्तृत्वशैली आत्मसात केली होती. अंगी हजरजबाबीपणा होताच, त्याला नंतर अभ्यासाची जोड मिळाली. अतिशय शांतपणे आणि साध्या शैलीतलं बोलणं, हा शिरस्ता. निबंध लिहिल्यासारखी वाक्यं. अगदी एकामागून एक. त्यांचीही एक विशिष्ट लय. त्यातला चढउतार ठरलेला. कुठंही अडखळणं नाही, की जडव्याळ शब्दांचा भडीमार नाही. भावनिक आवाहन करत लोकांच्या काळजाला हात घालण्याची हातोटी केवळ लाजवाब होती.
युती शासनाच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आबांनी सभागृह गाजवून सोडलं. ते बोलायला उभे राहिले की, युती सरकारचे मंत्री हडबडत. आबांचा प्रश्न म्हटल्यावर गृहपाठ करूनच जावं लागायचं, असं खुद्द गोपीनाथ मुंडेंनीच कबूल केलं होतं. वक्तृत्वासोबत स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू. साधेपणा, शांत स्वभाव हे जोडीला होतंच. जिल्हा परिषद सदस्य असताना मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी दिलेली जीप अजूनही अंजनीतल्या त्यांच्या घरापुढं उभी आहे. बाहेरून आलेली मंडळी कौतुकानं ती जीप बघतात. निष्कलंक चारित्र्य त्यांनी कसोशीनं जपलं. वसंतदादा पाटील, वि. स. पागे आणि विष्णुआण्णा पाटील यांना ते गुरूस्थानी मानत. विचारांची उंची आणि राजकीय भूमिका यात त्यांनी कधीच गफलत होऊ दिली नाही. ग्रामविकासमंत्री असताना ग्रामस्वच्छता स्पर्धा, गृहमंत्री असताना डान्सबार बंदीचा निर्णय आणि नंतर आणलेली तंटामुक्ती स्पर्धा हे आबांचे भन्नाट निर्णय. त्यामुळं खेड्यापाड्यापासून नागर समाजापर्यंत त्यांची क्रेझ निर्माण झाली. तब्बल २५ वर्षे विधानसभेत असणाऱ्या आबांची क्रेझ अखेरपर्यंत होती. ती आता अस्ताला गेली...

रावसाहेब रामराव पाटील हे नाव कुणाचं आहे, हे १९९० ते ९५च्या दरम्यान फारसं समजत नव्हतं, पण त्याचवेळी त्याच नावाचा ‘आर. आर. पाटील’ हा शॉर्टफॉर्म मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळात गाजत होता. १९९५ नंतर त्या शॉर्टफॉर्मआधी ‘लक्षवेधीकार’ हे विशेषण आलं आणि ९९ नंतर तर ग्रामविकासमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशा पदांमुळं या नावाची ‘क्रेझ’ निर्माण झाली. मुंबईतल्या उपनगरांपासून गावाकडच्या वाड्यावस्तापर्यंत ही ‘क्रेझ’ पोहोचली. यादरम्यान ती ‘आबा’ या दोन अक्षरांभोवती अलवार फिरू लागली होती...

आबांची वाचनाची मोठी आवड. इंद्रजित भालेराव, उत्तम कांबळे यांच्याशी असलेला स्नेह त्यातूनच उठून दिसायचा. तशा त्यांच्या आवडी-निवडी ‘जेमतेमच’ या प्रकारात मोडणाऱ्या. कधी ‘वस्त्रहरण’, ‘सही रे सही’सारखं नाटक पहायला जायचे, तर कधी ‘श्वास’ पाहण्यासाठी वेळ काढायचे, पण हे कधीतरीच जुळून यायचं!

Web Title: A crazy name called 'aaa' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.