मुंबई - रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात दर्जा राखला जात नाही, अल्पावधीतच या रस्त्यांना तडे जातात, अशा तक्रारी येऊ लागल्यामुळे रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी अखेर महापालिकेने आयआयटी, मुंबईसारख्या संस्थेची त्रयस्थ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. मात्र, रस्त्यांच्या कामाचा दर्जा अजूनही सुधारलेला नसून कुर्ल्यात १० कोटी खर्चून बांधलेल्या काजूपाडा रस्त्यावर लगेच भेगा पडल्याचे समोर आले आहे.
कुर्ला ‘एल’ वॉर्डातील सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या काजूपाडा रस्त्यावर अल्पावधीतच पडलेल्या भेगांमुळे हे काम गुणवत्तेच्या निकषांनुसार पूर्ण झालेले नसल्याचे स्पष्ट होते. त्यातून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरी सुरक्षिततेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेचे अपर आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खड्डे मुक्तीसाठी पालिकेने सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, कामाची गती पाहता ही ‘डेडलाईन’ गाठणे शक्य होणार नाही. त्यातही सुरुवातीपासून गोंधळ झाल्याने शहरातील कामे उशिरा सुरू झाली आहेत.१० कोटी खर्चून बांधलेल्या काजूपाडा रस्त्यावर लगेच भेगा पडल्याने पालिकेच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रशिक्षण मिळाले, पण दर्जात सुधारणा नाहीकाँक्रीटचे रस्ते ३० वर्ष टिकत असल्यामुळे काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्यांना तडे गेल्याचे आढळून आले. त्यामुळे काही कंत्राटदारांना पालिकेने दंडही ठोठावला होता. पण त्यानंतरही तक्रारी कायम राहिल्याने पालिकेने आयआयटी, मुंबईच्या तज्ज्ञांची नियुक्ती केली. तज्ज्ञांनी पालिकेचे अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदार व त्यांच्या कामगारांना रस्त्याची कामे कशी करावीत, याचे ‘धडे’ही दिले. या तज्ज्ञ पथकाने मध्यरात्री अनेक भागात जाऊन रस्त्यांच्या कामाची पाहणीही केली. पण तरीही कामाचा दर्जा राखला जात नसल्याची उदाहरणे समोर आल्याने या व्यवस्थेबाबत आता प्रश्चचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.