Join us

जास्त भाडे आकारलेल्या टॅक्सी चालकांना दणका; १५ जणांचे परवाने निलंबित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 11:12 IST

आपल्याला इच्छितस्थळी लवकर पोहोचता यावे म्हणून  प्रवासी बस आणि रेल्वेपेक्षा  रिक्षा आणि टॅक्सीचा वापर करतात.

मुंबई :  

आपल्याला इच्छितस्थळी लवकर पोहोचता यावे म्हणून  प्रवासी बस आणि रेल्वेपेक्षा  रिक्षा आणि टॅक्सीचा वापर करतात. परंतु, याचा गैरफायदा टॅक्सीचालक घेत असून, अवाच्या सव्वा भाड्याची मागणी  करतात. अशा रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यासाठी  वडाळा  आरटीओने व्हाॅट्सॲप क्रमांकाद्वारे तक्रार करण्याचे आवाहन प्रवाशांना  केले होते. २१ दिवसांत  वडाळा आरटीओमध्ये अशा १५४ तक्रारी आल्या. यापैकी ५९ तक्रारी वडाळा आरटीओशी संबंधित होत्या. यामध्ये ५९ रिक्षा, टॅक्सी चालकांपैकी १५ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 

रिक्षा, टॅक्सी चालकांकडून प्रवाशांशी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, जादा दराने भाडे आकारणे आदी समस्यांना प्रवाशांना रोजच सामोरे जावे लागते. यासाठी वडाळा आरटीओने प्रवाशांच्या मदतीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९१५२२४०३०३ व मेल आयडी mh०३autotaxicomplaint@gmail.com  ११ जुलैपासून सुरू केला आहे.

प्रवाशांची तक्रार आल्यानंतर  वाहनचालकाला नोटीस बजावण्यात येते. त्यांना ७ दिवसांचा कालावधी आपले म्हणणे मांडण्यासाठी दिला जातो. यामध्ये दोषी आढळलेल्या चालकाचा परवाना निलंबित केला जातो. पहिल्या दहा दिवसात १५ जणांचा परवाना निलंबित केला असून,  उर्वरित चालकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांच्या प्रत्येक तक्रारीची आम्ही दखल घेत आहोत. - विनय अहिरे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळा

कारावाई केलेले चालक ब्लॅक लिस्टेड1. वडाळा आरटीओकडे ४५ तक्रारी भाडे नाकारणे, ७ तक्रारी या जादा भाडे आकारणे व २ तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करणे याबाबत आल्या होत्या.2. ५४ परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी ११ चालकांचा भाडे नाकारणे या कारणासाठी परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे. 3. दोन चालकांचा प्रवाशांशी गैरवर्तन करणे यासाठी परवाना १० दिवसांसाठी निलंबित केला आहे व २ चालकांचा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाना १० दिवसांसाठी निलंबित केला आहे. 4. निलंबित केलेल्या १५ वाहनांना वाहन प्रणालीवर ब्लॅक लिस्ट केले आहे. 

टॅग्स :टॅक्सीमुंबई