कारवाईचा धडाका सुरुच
By Admin | Updated: October 9, 2014 03:03 IST2014-10-09T03:03:06+5:302014-10-09T03:03:06+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ १ च्या पोलिसांनी एकूण ७ पिस्तुले जप्त केली आहेत. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करून ७ जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

कारवाईचा धडाका सुरुच
नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ १ च्या पोलिसांनी एकूण ७ पिस्तुले जप्त केली आहेत. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करून ७ जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ १ च्या पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आचारसंहिता लागू झाल्यापासून ७ जणांना अटक करून त्यांच्याकडून ७ पिस्तुले जप्त केली आहेत. त्याशिवाय ३ मॅग्झीन व ११ जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. तुर्भे एमआयडीसी, रबाळे, रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाणेअंतर्गत या कारवाया झालेल्या आहेत. या कारवाईदरम्यान अटक केलेल्या व्यक्ती सराईत गुन्हेगार आहेत. ऐन निवडणूक काळात हे सर्व जण शस्त्रविक्रीच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत, अन्यथा त्यांच्याकडील शस्त्रांचा वापर निवडणूक काळात दहशत निर्माण करण्यासाठी झाला असता. एकूण सात कारवायांपैकी एक कारवाई ही रबाळे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ऐरोली येथे केली आहे. त्यामध्ये किसन तेजबहादूर थलारी याला अटक केली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अहमद महमद हसन साह (२७)या सराईत आरोपीला एमपीडीए लागू केला आहे. पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्तावाला आयुक्तांच्या मंजुरीनंतर त्याला मंगळवारपासून एमपीडीएची कारवाई लागू झाली आहे. या कारवाईअंतर्गत साह याला दोन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. त्याशिवाय १३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली आहे. कारवाई नंतरही हे गुन्हेगार शहरात आढळल्यास त्यांना पुन्हा पोलिसांच्या सक्त कारवाईला सामोरे जावे लागेल असेही उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. आचारसंहिता लागु झाल्यापासुन पोलिसांनी एकुन १९ फरार गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. फरार गुन्हेगारांना अखेर निवडणुक काळात जेलबंद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)