Join us  

शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच! शिक्षकांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:49 AM

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यानंतर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच शाळेत दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबालाही आहे.

मुंबई - लॉकडाऊनमध्ये चेकपोस्ट, क्वारंटाइन केंद्रे, गावातील प्रत्येक घरी जाऊन तपासणी करणे, आरोग्य केंद्रांवरील ड्युटी, आॅनलाइन शिकवणी अशा सर्व कसरती एकहाती करूनही शिक्षक नावाचे कोविड योद्धे दुर्लक्षितच राहिल्याची नाराजी शिक्षकांमध्ये आहे.कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यानंतर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच शाळेत दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबालाही आहे. कोविड योद्ध्यांप्रमाणे काम करूनही त्यांना अद्याप मूळ पगार, शाळांचे अनुदान, हक्काच्या बदल्या यासाठी झगडावे लागत असल्याची खंत शिक्षक, मुख्याध्यापकांकडून शिक्षक दिनाच्या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.शिक्षण विभाग ‘थँक्स अ टीचर’ ही मोहीम राबवत असताना शिक्षकांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी जुंपले जाते. सेवानिवृत्त होऊनही पेन्शनसाठी फेºया माराव्या लागतात. या सर्व कामातून सुटका झाली तर शिक्षक स्वत:चे ज्ञानदानाचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडू शकतील. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण विभागाने एवढी तरी भेट द्यावी, अशी अपेक्षा लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी व्यक्त केली.अंशत: अनुदानित शिक्षक महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती विनाअनुदानित शाळांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगली ते बारामती पायी दिंडी प्रवास करत आहे. १० वर्षे काळा शिक्षक दिन साजरा करूनही सरकारला जाग आली नसल्याचे कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज म्हणाले.लाभांपासून वंचितरात्रशाळेतील शिक्षकांना पूर्णवेळ वेतनश्रेणी, पेन्शन योजना, घरभाडे भत्ता व इतर लाभ देण्यासाठी सरकारने १७ मे २०१७ रोजी धोरणात्मक निर्णय घेतला. तरीही तीन वर्षांपासून ते सर्व लाभांपासून वंचित आहेत. ४ सप्टेंबरला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. शाळांना पूर्ण वेळ शाळांचा दर्जा द्यावा, अनुकंपा भरतीला तत्काळ मान्यता द्यावी, निवडश्रेणी सरसकट २४ वर्षांनंतर लागू करावी, अशा मागण्या केल्या. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण विभाग या मागण्या पूर्ण करून ‘थँक्स अ टीचर म्हणणार का?’ याची प्रतीक्षा असल्याचे शिक्षक परिषदेचे रात्रशाळा विभागाचे राज्य संयोजक निरंजन गिरी म्हणाले.

टॅग्स :शिक्षक दिनमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस