Join us  

मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी! धारावीत पुन्हा वाढतोय संसर्गाचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 8:58 PM

कोरोनाचा प्रसार कसा रोखावा? याचा आदर्श जगापुढे निर्माण करणाऱ्या धारावीत आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

मुंबई - कोरोनाचा प्रसार कसा रोखावा? याचा आदर्श जगापुढे निर्माण करणाऱ्या धारावीत आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे. ३७ दिवसांनंतर बुधवारी दोन अंकी रुग्णांची नोंद या भागात झाली होती. तर गुरुवारी नऊ बाधित रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यावेळेस येथील झोपडपट्टीमध्ये नव्हे तर इमारतींमध्ये रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पालिका यंत्रणा सतर्क झाली आहे.

एप्रिल २०२० मध्ये धारावीत कोरोनाचा प्रसार सुरू झाला, व झपाट्याने वाढू लागला. आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी येथे असल्याने धारावी मध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या. या प्रयत्नांना यश येऊन धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर आली. धारावी पॅटर्नचे अनुकरण इतर देशातही होऊ लागले. धारावी ने आतापर्यंत शून्य रुग्ण संख्येचा षटकार मारला आहे. 

मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्ण संख्येत वाढ होत असताना धारावी परिसरातही रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी केवळ १२ सक्रिय रुग्ण असलेल्या धारावीत आता ३७ रुग्ण आहेत. पुनश्च हरिओम झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन सुरू झाले आहे, मास्क न लावणे, गर्दी करणे, सुरक्षित अंतर न पाळणे अशा बेजबाबदार वर्तनामुळे संसर्ग वाढू लागला असल्याची नाराजी पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

"इमारतींमध्ये रुग्ण वाढ दिसून येत आहे. प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना सुरू असल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस रुग्ण वाढीचा ट्रेण्ड पाहून क्वारांटाइन केंद्र वाढविणे आदी उपाय केले जातील"- किरण दिघावकर (सहायक पालिका आयुक्त, जी उत्तर)

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी 

परिसर....एकूण....सक्रिय....डिस्चार्ज...२५ रोजी

दादर....५०७५....१२२.....४७८७....११

धारावी....४०५०....३७....३६९७....०९

माहीम....४९६०....१४३....४६६३...१४

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसधारावीकोरोना वायरस बातम्यामुंबई