Court approves custody of 'that' girl to parents | ‘त्या’ मुलीचा ताबा पालकांकडे देण्यास न्यायालयाची मान्यता

‘त्या’ मुलीचा ताबा पालकांकडे देण्यास न्यायालयाची मान्यतालोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पोलिसांनी मानवी तस्करी प्रकरणी १४ वर्षांच्या महिला कलाकाराची सुटका केल्यानंतर दिंडोशी सत्र न्यायालयानेही तिला मुक्त केले. तिचा ताबा पालकांकडे देण्यास हिरवा कंदील दाखवला. मात्र, या मुलीची सुरक्षा लक्षात घेता तिचा ताबा कोणाकडे द्यायचा, हे बालकल्याण समितीच्या निर्णयानंतरच ठरवणार असल्याची भूमिका सध्या मुलगी राहत असलेल्या कांदिवलीतील एनजीओने घेतली आहे. 
अनेक मालिकांत काम करणाऱ्या १४ वर्षांच्या बालकलाकाराची साडेतीन लाखांत विक्री करण्याचा डाव अंधेरी पोलिसांनी हाणून पाडला. तसेच या प्रकरणी तीन कास्टिंग डायरेक्टरना गजाआड केले. यासाठी ॲड. असोसिएट्स अंकित उपाध्याय, विकास सिंह आणि आशिष राय यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे महिनाभरानंतर या बालकलाकाराचा ताबा तिच्या आईकडे देण्यात यावा, असे निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने कांदिवलीतील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेच्या अधीक्षकांना दिले, असे राय यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे तिची सुटका करावी, अशी विनंती तिच्या आईकडून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे. मात्र बालकल्याण समितीच्या निर्णयानंतरच मुलीचा ताबा काेणाकडे द्यायचा हे ठरविण्यात येईल, असे स्पष्ट करीत संस्थेने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली.

मुलीची सुरक्षा महत्त्वाची! 
पीडित मुलीचा ताबा कोणाकडे द्यायचा, याचा निर्णय मार्गदर्शक तत्त्वानुसार बालकल्याण समिती घेते. अल्पवयीन मुलीची सुरक्षा हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने समितीच्या निर्देशानुसार पोलिसांच्या माध्यमातून मुलीचे घर तसेच तिच्या सुरक्षेबाबत पडताळणी होते. सत्र न्यायालयाने मुलीला बालकल्याण समितीकडे नेण्याबाबत काही सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे संस्था प्रमुखांनी सत्र न्यायालयात धाव घेतली असून, त्यानुसार मुलीचा ताबा कोणाकडे द्यायचा हे ठरविण्यात येईल. 
- लीना जाधव, अधीक्षक, रेस्क्यू फाउंडेशन

उच्चस्तरीय चौकशी करा 
बॉलीवूडमध्ये मानवी तस्करी हा प्रकार अत्यंत गंभीर मुद्दा असून त्याबाबत सीबीआय किंवा अन्य उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी करावी. या सर्वांमागे मास्टरमाईंड कोणीतरी वेगळाच असून त्याला अटक करावी, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Court approves custody of 'that' girl to parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.