Join us

विनयभंगावरील क्लोजर रिपोर्ट काेर्टाने स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 05:34 IST

Crime News: इस्लाम जिमखान्याचे सरचिटणीस नुरुल अमीन आणि बिलियर्ड्स खेळाडू रियान आझमी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या विनयभंगाच्या तक्रारीत मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट एस्प्लनेड न्यायालयाने स्वीकारला आहे.

मुंबई -  इस्लाम जिमखान्याचे सरचिटणीस नुरुल अमीन आणि बिलियर्ड्स खेळाडू रियान आझमी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या विनयभंगाच्या तक्रारीत मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट एस्प्लनेड न्यायालयाने स्वीकारला आहे.

जिमखान्याच्या तहहयात सदस्याने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी या दोघांविरोधात विनयभंगाची तक्रार केली. ‘नुरुल अमीन महिलांच्या चेंजिग रूममध्ये जबरदस्तीने घुसले. आपल्यावर ओरडले आणि आपल्याला अयोग्यरीत्या स्पर्श केला. तसेच गैरवर्तन रियान आझमी यांनी केले, अशी तक्रार संबंधित महिलेने केली होती.

मरीन ड्राइव्ह पोलिसांनी मे २०२३ मध्ये या गुन्ह्यात ‘बी समरी’ रिपोर्ट सादर केला. ही तक्रार हेतुपुरस्सर दाखल केली असून, अशा प्रकारचा कोणताही गुन्हा घडलेला नाही, असे ‘बी समरी’ रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. झंवर यांनी हा अहवाल स्वीकारला.

सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात आरोपींची नावे घेतली नाहीत आणि नंतर ती क्लबमध्ये त्यांच्याशीच संवाद साधताना दिसली. कोणतेही पुरावे नसल्याचे बी-क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारीन्यायालयमुंबई