Join us

राणीच्या बागेत उभारणार देशातील पहिले बंदिस्त ‘डोम’ पक्षिगृह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 05:31 IST

पक्षिगृह २ हे पूर्णपणे बंदिस्त असून यात पर्यटक आतमध्ये जाऊन विहार करत पक्षी निरीक्षण करतील.

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात डोम पद्धतीचे पक्षिगृह २ उभारण्यात येणार आहे. पक्षिगृहाला ‘वायर रोप मेश’ (स्टेनलेस स्टील) वापरून पिंजरा तयार केला जाणार आहे. हा पिंजरा ५० वर्षांहून अधिक काळ टिकू शकतो. अशा प्रकारचे हे देशातील पहिले डोम पद्धतीचे बंदिस्त पक्षिगृह असणार आहे.पक्षिगृह २ हे पूर्णपणे बंदिस्त असून यात पर्यटक आतमध्ये जाऊन विहार करत पक्षी निरीक्षण करतील. यामध्ये हेरॉन्स, क्रॉन्स, मालढोक, पेलीकन अशा २० प्रजातींच्या पक्ष्यांना ठेवण्यात येणार आहे. पक्षिगृहामध्ये झाडे, तलाव आणि धबधबादेखील असणार आहे.राणीबागेमध्ये तीन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये ‘वॉक थु्र एव्हीअरी’ (पक्षिगृहात मुक्तपणे संचार) या संकल्पनेवर आधारित बंदिस्त पक्षिगृह २ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पक्षिगृह २ चे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होऊन पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यंत्रणांचा वापर करून डोम शेफमध्ये पक्षिगृह उभारले जात आहे. पर्यटक फार जवळून पक्ष्यांचे निरीक्षण करू शकतील, अशा पद्धतीने पक्षिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन किपर कर्मचारी व डॉक्टरांची टीम तैनात राहणार आहे.- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्षिगृह २ हे पर्यटकांसाठी खुले केले जाईल, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :मुंबई