Join us  

मोकाट गुरांना सोडविण्यासाठी आता दहा हजार मोजा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 2:21 AM

पालिकेचा प्रस्ताव : स्थायी समितीच्या पटलावर दाखल

मुंबई : वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरात अनधिकृत पार्किंगवरील कारवाईनंतर आता मंदिरांबाहेर गार्इंना बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कोंडवाड्यात ठेवलेली अशी गुरे सोडविण्यास येणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तब्बल १५ वर्षांनंतर या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात येत आहे.

मुंबईत अनेक भागांमध्ये मंदिरांबाहेर, चौक, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी गाई-गुरे बांधली जातात. त्यांना चारा देण्याच्या मोबदल्यात लोकांकडून पैसे घेण्यात येतात. मात्र यामुळे अनेक वेळा रस्ता अडविला जातो, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच गाई बांधतात, त्या ठिकाणीच गाईचे मूत्र, शेण, चारा पडून राहिल्याने अस्वच्छता निर्माण होते. मोकाट गाई-गुरे पालिका कामगार जप्त करून मालाड येथील कोंडवाड्यात ठेवतात. या गुरांना सोडविण्यासाठी आतापर्यंत अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात येत होता. मात्र या दंडात वाढ करून दहा हजार रुपये करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. २००४ मध्ये दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली होती. यामध्ये आता १५ वर्षांनी वाढ होत आहे. 

टॅग्स :गायमुंबई