Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 06:23 IST

काही मार्गिका यापूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. पूर्ण कोस्टल रोड नव्या वर्षात पूर्ण होईल.

मुंबई - कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात आणखी १३०९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ७२१ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. आता हा खर्च १४ हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या भाग-१ च्या कामासाठी ५२९० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सीलिंकचे दक्षिणेकडील टोक या भाग -२साठी ३२११ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. पुढल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क या कामासाठी ४२२० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. अशा प्रकारे सर्व टप्प्यांतील खर्चात ३३९ कोटींची वाढ झाली. त्यानंतर एकूण सुधारित खर्च १३०६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मच्छीमारांच्या बोटींच्या जाण्या-येण्यासाठी दोन खांबामधील अंतर वाढवून एकल खांबी बांधकामाचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रकल्प खर्चात ९२२ कोटी रुपयांची वाढ झाली. आता नवीन टेट्रापॅड बसवण्यात आले. त्यासाठी ४७. २७  कोटी रुपये खर्च झाले.

काही मार्गिका यापूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. पूर्ण कोस्टल रोड नव्या वर्षात पूर्ण होईल. अंतिम टप्प्यात सीलिंक विस्तारातील मरिन ड्राईव्ह ते वांद्रे- वरळी सीलिंकच्या दिशेने जाण्यासाठी शेवटचा गर्डर टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. जानेवारी २०२५ पर्यंत अंतिम टप्पा पूर्ण होऊन त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकल्प पूर्णत्वास जाईल. त्यानंतर मरिन ड्राईव्ह ते वांद्रे - वरळी असा दोन्ही दिशांनी वाहनांना प्रवास करता येईल. अंतिम टप्प्यात सीलिंक विस्तारासाठी उत्तरेकडील गर्डरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर आता काँक्रिटीकरण, विद्युत खांबांची उभारणी आणि अन्य तांत्रिक कामे पूर्ण केली जातील. ही कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका