मुंबई - दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाला नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या बैठकीत प्रकल्पासाठी नाममात्र दराने जमीन देण्याची मागणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
उत्तन-विरार सागरी सेतू थेट मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेबरोबर विरारजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना विनाअडथळा थेट मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. त्याची एकूण लांबी ५५.४२ किमी असेल. एमएमआरडीएने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा यापूर्वीच मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. एमएमआरडीएचा जपानच्या जायका या वित्तीय संस्थेकडून कर्ज उभारण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्यावर परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याच्या मंजुरीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. तसेच केंद्राकडे सार्वभौम हमीचाही प्रस्ताव मांडला जाईल. एमएमआरडीएच्या बैठकीत या प्रकल्पासाठी गरजेनुसार एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याचीही विनंती राज्य सरकारकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नरिमन पॉइंट ते विरार प्रवास एका तासावरमरीन ड्राईव्ह ते विरार अशा सागरी मार्गाची उभारणी केली जात आहे. पालिकेने उभारलेला मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला. तर वांद्रे-वरळी सी लिंक वापरात आहे. सद्यस्थितीत एमएसआरडीसीकडून वांद्रे - वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. त्यापुढे वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. तर एमएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या भाईंदर ते विरार सागरी मार्गामुळे दक्षिण मुंबईतून थेट विरारपर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होईल. त्यातून नरिमन पॉइंट येथून विरार येथे पोहोचण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ लागणार आहे.