Join us
Daily Top 2Weekly Top 5

१२ कोटी खर्चून ‘जे. जे.’ वर रोषणाई; सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांच्या खिशावर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 10:03 IST

सुशोभिकरण मोहिमेंतर्गत सध्या उड्डाणपूल, उद्याने याठिकाणी मुंबई महापालिकेने कामांचा धडाका लावला आहे.

मुंबई : सुशोभिकरण मोहिमेंतर्गत सध्या उड्डाणपूल, उद्याने याठिकाणी मुंबई महापालिकेने कामांचा धडाका लावला आहे. जी-२० परिषदेनंतर तर रोषणाईवर खास भर दिला आहे. 

आतापर्यंत अनेक उड्डाणपूल रोषणाई करून चमकवले आहेत. त्यासाठी १ ते ३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हाच प्रयोग आता जे. जे. पुलावर करण्यात येणार आहे. या रोषणाईसाठी करण्यात येणारा १२ कोटींचा खर्च डोळे विस्फारून टाकणारा आहे. त्या कामासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

१२ कोटी खर्चून नेमकी कशाप्रकारे रोषणाई केली जाणार आहे, याची माहिती पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडून मिळू शकली नाही. 

 कार्यालयातही वरिष्ठ अधिकारी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. पालिकेने याही आधी विविध भागांतील उड्डाणपुलांवर रोषणाई केली आहे. ‘ए’ वाॅर्डातील साधू वासवानी, जी. डी. सोमाणी याठिकाणी उड्डाणपूल आणि पदपथ येथे एक ते दोन कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

आचारसंहितेपूर्वी कामे करण्यावर भर :

  लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मध्यंतरी सुशोभिकरण  मोहिमेंतर्गत कामांचा वेग मंदावला होता.

  सरकार दरबारी त्याविषयी नाराजी व्यक्त झाली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने बैठक बोलावून कामांचा आढावा घेतला.

विभागांना कोट्यवधींचा निधी :

मुंबई सुशोभिकरणाच्या मोहिमेसाठी १७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली  आहे. त्यापैकी ७१५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. १२८५ कामांचे कार्यादेश देण्यात आले असून, त्यापैकी ९९४ कामे पूर्ण झाली आहेत. शहर विभागात ३१९ तर उपनगरात ६८५ कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी विविध विभागांना निधी देण्यात आला आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिका