१० दिवसांत रस्ते सुधारा

By Admin | Updated: May 22, 2014 04:28 IST2014-05-22T04:28:23+5:302014-05-22T04:28:23+5:30

पावसाळा लक्षात घेऊन येत्या १० दिवसांत शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी प्रशासनाला दिले

Correct the roads in 10 days | १० दिवसांत रस्ते सुधारा

१० दिवसांत रस्ते सुधारा

कल्याण : पावसाळा लक्षात घेऊन येत्या १० दिवसांत शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी प्रशासनाला दिले. कल्याण पूर्वेला दौरा करून महापौरांनी तेथील रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून या सूचना केल्या. केडीएमसी क्षेत्रात प्रशासनाकडून मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ करण्यात आला असून नालेसफाईच्या कामांना सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी रस्त्यांची सिमेंट-काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. परंतु, या कामांची संथगती पाहता बर्‍याच ठिकाणी रस्त्यात खड्डे असे चित्र पाहावयास मिळत आहे. यासंदर्भात नुकतेच लोकमतने वृत्त प्रसारित करून या संथगती कारभारावर प्रकाश टाकला होता. प्रशासनाकडून रस्त्यांच्या कामांना दिरंगाई होत असताना महापौर पाटील यांनी मंगळवारी दौरा करून अधिकार्‍यांना तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. कल्याण पूर्वेला केलेल्या दौर्‍यात त्यांनी चककीनाका, तिसगावनाका, काटेमानिवली, खडेगोळवली आदी भागांत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांचा वेग वाढवून येत्या १० दिवसांत रस्ते सुस्थितीत आणा, असे आदेश त्यांनी दिले. ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी साचलेले मातीचे ढिगारे तत्काळ हटवा आणि तेथील वाहतूूक सुरू करा, अशा सूचनाही करण्यात आल्या. या वेळी नगरसेवक कल्याण धुमाळ, अनंता पावशे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख शरद पाटील, केडीएमसीचे प्रकल्पप्रमुख प्रमोद कुलकर्णी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक भोसले, प्रशांत भुजबळ यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Correct the roads in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.