प्रभाग सुजलाम्-सुफलाम् करण्यात नगरसेवक यशस्वी
By Admin | Updated: January 16, 2015 23:01 IST2015-01-16T23:01:38+5:302015-01-16T23:01:38+5:30
महानगरपालिकेचा हा प्रभाग विरार शहराच्या पश्चिमेस आहे.

प्रभाग सुजलाम्-सुफलाम् करण्यात नगरसेवक यशस्वी
दीपक मोहिते, वसई
महानगरपालिकेचा हा प्रभाग विरार शहराच्या पश्चिमेस आहे. गेल्या काही वर्षांत या परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सुरुवातीपासूनच सर्व पाणीपुरवठा योजनांत या प्रभागाचा समावेश झाल्याने प्रभागात पाणीटंचाईची तीव्रता कमी होत गेली. १९८० च्या दशकात पाण्याच्या टँकरवर रहिवासी आपली तहान भागवत असत. आता मात्र येथे टँकर पाहावयास मिळत नाहीत. सूर्या, उसगाव या दोन्ही पाणीपुरवठा योजनांचे पाणी मिळत असल्यामुळे करदात्यांना दिलासा मिळू शकला.
या प्रभागामधून बहुजन विकास आघाडीचे साथीराज नाहटा निवडून आले. गेल्या साडेचार वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लागली. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला. सध्या या प्रभागात भूमिगत गटारांची कामे सुरू आहेत. दरवर्षी अतिवृष्टीमध्ये परिसरामध्ये पाणी साचत असते. ते आता भूमिगत गटारांमुळे होणार नाही. केंद्र सरकारच्या सॅटेलाइट सिटी योजनेंतर्गत मिळालेल्या आर्थिक निधीतून या प्रभागामध्ये अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. प्रभागातील लोकसंख्या सध्या चढत्या कमानीवर आरूढ आहे. लोकसंख्येची ही वाढ लक्षात घेऊन भविष्यात विकासकामांचा वेगही वाढणे गरजेचे आहे.
प्रभागामध्ये आता १२ मजली इमारतीच्या बांधकामांना परवानग्या देण्यात येत आहेत. त्यामुळे अल्पावधीतच येथील लोकसंख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. प्रभागामध्ये व आसपासच्या परिसरात खाजगी शिक्षण संस्थांच्या अनेक शाळा आहेत तसेच महाविद्यालयही आहे. त्यामुळे भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे शक्य झाले आहे. मात्र, भविष्यातील वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. या कामासाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडून अनुदानही मिळू शकते. त्यासंदर्भात येथील करदात्यांना साहजिकच आपल्या नगरसेवकाने या महत्त्वाच्या विकासकामांचा पाठपुरावा करावा, असे वाटते.