लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी सायबर कॉर्पोरेशन उभारत असून, तो देशातील सर्वांत चांगला प्लॅटफॉर्म असेल.
तसेच या गुन्ह्यांच्या तक्रारीसाठी १९४५ हा सायबर क्रमांक सरकार घेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जिओ सेंटरमध्ये ‘मुंबई टेक वीक २०२५’ या आशियातील सर्वांत मोठ्या एआय इव्हेंटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय ॲण्ड पॉलिसी’ या विषयावर लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
२००० ते २०१४ या काळात महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्र, अटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
नदीजोड प्रकल्पाविषयी...विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समुद्रात वाया जाणारे पाणी गोदावरीत सोडले जाईल. यातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे लक्ष्य आहे, असेही फडणवीस यांनी या मुलाखतीत जाहीर केले.
मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे कौशल्य व रोजगारमंत्री मंगल प्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी, टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, एनएसईचे एमडी आशिष चौहान, सेल्सफोर्सच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य, जिओस्टारचे व्हाइस चेअरपर्सन उदय शंकर, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे प्रेसिडेंट पुनीत चांडक, मेटा इंडियाच्या व्हाइस प्रेसिडेंट संध्या देवनाथन, हॅप्टिक इन्कॉर्पोरेशनचे आक्रित वैश, ड्रीम इलेव्हनचे हर्ष जैन, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे आदी मान्यवर उपस्थित होते.