Join us  

महिला आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर राहून करत होत्या काम

By यदू जोशी | Published: June 07, 2020 5:41 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजय मेहता यांनी ११ वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांचा कोरोना नियंत्रण कक्ष २३ मार्च रोजी मंत्रालयात स्थापन केला होता.

- यदु जोशीमुंबई - राज्य शासनाच्या एका विभागाच्या सचिव असलेल्या आणि आणि कोरानाविरुद्धच्या लढाईत उतरलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. या अधिकार्‍यास सध्या मंत्रालयासमोरील त्यांच्या निवास्थानीच क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि तेथेच उपचार करण्यात येत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजय मेहता यांनी ११ वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांचा कोरोना नियंत्रण कक्ष २३ मार्च रोजी मंत्रालयात स्थापन केला होता. त्या अधिकाऱ्यांमध्ये या वरिष्ठ आयएएस महिलेचा समावेश होता. तेव्हापासून त्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरल्या आहेत. या नियंत्रण कक्षातील कोरोनाची लागण झालेल्या त्या पहिल्या अधिकारी आहेत.या महिला अधिकाऱ्याकडे सायन,नायर, कूपर हॉस्पिटलमधील कोविड आणि नॉनकोविड रुग्णांच्या व्यवस्थेसंदर्भात समन्वयाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदानासाठी पुढे या असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कोविड योद्धे समोर आले. या योद्धयांची त्यांच्या शैक्षणिक व अन्य योग्यतेनुसार छाननी करून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्यासंदर्भातील संपूर्ण नियोजनाची जबाबदारी या अधिकारी महिलेकडे होती. मुख्यमंत्र्यांनी या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली तसेच कोविड योद्धयाना आभाराचे पत्रही दिले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरल्यानंतर या महिला अधिकाऱ्याने दीड महिना घरी न जाता काम केले. हॉटेलमध्ये राहून व्यवस्था सांभाळली.उत्पादन शुल्क, विक्रीकर माहिती व जनसंपर्क अशा विविध विभागांमध्ये त्यांनी यापूर्वी सक्षमरित्या जबाबदारी सांभाळली आहे.या महिला अधिकाऱ्यासह आतापर्यंत राज्यातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यापैकी एक लीलावती हॉस्पिटलमध्ये तर अन्य अधिकारी जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई