Join us  

Coronavirus: चिंता करू नका! शहरात अत्यावश्यक सामान कुठे अन् केव्हा मिळणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:25 PM

मुंबई विद्यापीठ येणार लोकांच्या मदतीसाठी धावून, आयटी विभागाकडून माहिती देणाऱ्या संकेतस्थळाची निर्मिती सुरु

सीमा महांगडे

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात घरातील अत्यावश्यक सामान संपले आहे, औषधे , गोळ्या आणायच्या आहेत. अन्नधान्य आणायचे असलेल्या सुपरमार्केट किंवा दुकानाची वेळ मात्र माहिती नाही असे अनेक प्रश्न सध्या घरात बसलेल्या समन्याना सतावत आहेत. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता मुंबई विद्यापीठ देऊन आपली मदत करणार आहे. आता तुम्ही म्हणाल मुंबई विद्यापीठ आणि या सगळ्याचा काय संबंध ? मात्र मुंबई विद्यापीठाच्या आयटी डिपार्टमेंट आणि त्यातील विद्यार्थ्यांकडून अशा संकेतस्थळाची निर्मिती केली जात आहे जिथे आपल्याला ही सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. शहरातील कोणते दुकान, मेडिकल, भाजीचे दुकान किती वाजेपर्यंत चालू असणार आहे, त्याचा पत्ता काय? कोणत्या दुकानात काय काय मिळू शकणार आहे या सगळ्याची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून मुंबई विद्यापीठाच्या या संकेत स्थळामुळे सर्व सामान्यांना या संकटाच्या काळात यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे.लॉकडाऊनचा काळ सगळ्यांसाठी कठीण आहे. आधीच संचारबंदी असल्यामुळे विनाकारण फिरण्यावर आणि दूरवर जाण्यावर बंदी आली आहे. तसेच दुकाने ही काही निश्अचित तासांसाठीच , ठरवून दिलेल्या वेळेत चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा  परिस्थितीत एखादे औषध किंवा सामान जवळच्या दुकानात , मेडिकल मध्ये उपलब्ध नसल्यास लोकाना हात हलवीत परत यावे लागत आहे. बऱ्याचदा दुकानांच्या वेळा लोकाना माहित नसल्याने अत्यावश्यक सामान ही मिळेनासे झाले आहे.  या पार्श्वभूमीवर लोकांच्या या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आयटी विभागातील ७ विद्यार्थी विभागप्रमुख डॉ श्रीवरमंगाई आर यांच्या मार्गदर्शनाखाली  शहरातील अत्यावश्यक सामानाची दुकाने , मेडिकल , अन्न धान्याची दुकाने , दवाखाने, लहान मुलांचे सामान अशा विविध गरजांची उपलब्धता असलेल्या दुकाने आणि आस्थापनांची माहिती गोळा करत आहेत. या संकेतस्थळाची निर्मिती पूर्ण झाली असून माहिती गोळा झाली आणि त्यांचे कन्फर्मेशन झाले की हे जनसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे आयटी विभागातील एमएससी पार्ट १ आणि पार्ट २ च्या वर्गातील हे विद्यार्थी सध्या आपापल्या घरी असून तेथून हे काम कलेक्टिव्हली करत आहेत आणि त्यावर मेहनत घेत आहेत. विश्वराज पाटील, साहू रोहित कुमार,सानिका डोंगळे, सारिका घोडके,अक्षय भालेराव, कन्हैया का कानसरे, सविता परमेश्वरे हे विद्यार्थी यावर काम करत आहेत. यापूर्वी मुंबई विद्यापीठाकडून या काळात मानसिक समुपदेशनासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आल्यानंतर या संकेतस्थळाच्या निमित्ताने या दुसऱ्या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.अद्याप या संकेस्थळावर काम सुरु असून माहिती गोळा केली जात आहे, तसेच काही शासकीय परवानग्यांचे कामही सुरु आहे. मात्र संकटकाळात लोकांच्या उपयोगासाठी मुंबई विद्यापीठाने केलेला हा छोटासा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया विद्यापीठ प्रशासनाने दिली

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई विद्यापीठ