Join us  

Mumbai Coronavirus Updates: “लोकांनी ऐकलं नाही तर मुंबईत कोरोनाचा स्फोट होईल; शेवटी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 12:56 PM

Mumbai Lockdown Update: त्याचसोबत लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली तर गरिबांना किमान पैसे द्यावे लागतील किंवा काहीतरी त्यांच्यासाठी करावं लागणर आहे.

ठळक मुद्देकोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे, आपण सगळ्या सुविधा वाढवू शकतो परंतु आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी कसा करायचा?आठ वाजल्यानंतर आपण लॉकडाऊनसारखी अंमलबजावणी केली आहे, मॉल्स, रेस्टॉरंट बंद करणं बंधनकारक केले आहे.मुंबईची परिस्थिती गॅससारखी झाली आहे, वेळीच रोखलं नाही तर कोरोनाचा स्फोट होईल

मुंबई – शहरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे मुंबईत लॉकडाऊन लागण्याची भीती सर्वसामान्यांना पडली आहे. कारण लॉकडाऊन लागलं तर त्याचा आर्थिक फटका सगळ्यांनाच सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईत लॉकडाऊन लावावा की कडक निर्बंध आणवेत यावर चर्चा होणार असल्याची माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.(Mumbai Coronavirus Updates)  

याबाबत अस्लम शेख म्हणाले की, भारतात अनेक लोकं रोजंदारीवर पोट भरतात, छोट्या छोट्या हॉटेलमध्ये काम करतात, स्थलांतरित कामगारांच्या जेवणाची व्यवस्था मागील लॉकडाऊनमध्ये महापालिकेकडून करण्यात आली होती. आज अशीच परिस्थिती आली तर काय करावं लागेल याचा विचार सरकार करत आहे, संध्याकाळच्या बैठकीत सरकारवर यावर निर्णय घेईल असं अपेक्षित आहे. आपल्याकडे खासगी हॉस्पिटलची क्षमता संपत आलेली आहे, २१०० पर्यंत बेड्स उपलब्ध करून देण्याची तयारी सुरु आहे. पण कुठेतरी कोरोनाची साखळी ब्रेक झाली पाहिजे, गरज असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावं असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली तर गरिबांना किमान पैसे द्यावे लागतील किंवा काहीतरी त्यांच्यासाठी करावं लागणर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत हॉटेल आहेत, त्याठिकाणी काम करणारे कर्मचारी, अनेक कारखान्यात काम करणारे मजूर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आज बैठक होणार आहे, कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे, आपण सगळ्या सुविधा वाढवू शकतो परंतु आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी कसा करायचा? मुंबईची परिस्थिती गॅससारखी झाली आहे, वेळीच रोखलं नाही तर कोरोनाचा स्फोट होईल अशी भीती पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली.   

दरम्यान, आठ वाजल्यानंतर आपण लॉकडाऊनसारखी अंमलबजावणी केली आहे, मॉल्स, रेस्टॉरंट बंद करणं बंधनकारक केले आहे. झोपडपट्टीऐवजी मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतोय, त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. नागरिकांनी सावध राहावं, आजही अनेक ठिकाणी गर्दी होत आहे, असं होणार असेल तर शेवटी सरकारला लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही अस्लम शेख यांनी दिला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई