Join us

Coronavirus: उकाड्याने हैराण नागरिक उतरले रस्त्यावर; साकीनाक्यात दोन तास ‘बत्ती गुल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 01:36 IST

अंधेरी पूर्वच्या साकीनाका परिसरात काजूपाडा येथे शेकडो लोक राहतात. सध्या मुंबईत उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असताना सकाळी या परिसरात वीजपुरवठा बंद झाला

मुंबई : कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये ‘बत्ती गुल’ झाल्याने साकीनाक्यातील रहिवाशांना घराबाहेर पडावे लागले. दोन तासांहून अधिक काळ वीज नसल्याने घरात पंखे बंद झाले आणि उकाडा सहन न झाल्याने काही स्थानिक रस्त्यावर उतरले. त्याबाबत अदानी वीज कंपनीला त्यांनी दोष देण्यास सुरुवात केली. मात्र या ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्याने हा प्रकार घडल्याचे अदानी वीज कंपनीच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.

अंधेरी पूर्वच्या साकीनाका परिसरात काजूपाडा येथे शेकडो लोक राहतात. सध्या मुंबईत उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असताना सकाळी या परिसरात वीजपुरवठा बंद झाला. जवळपास दोन तास हाच प्रकार सुरू असल्याने स्थानिकांना घराबाहेर पडावे लागले. याबाबत अदानी वीज कंपनीकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मीटर बॉक्सला आग लागल्याने वीजप्रवाह खंडित झाल्याचे चौकशीअंती उघड झाले. या परिसरात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा प्रकार घडल्याचे कंपनी प्रवक्त्याचे म्हणणे आहे. लॉकडाउनमुळे फिजिकल डिस्टन्स पाळण्याच्या उद्देशाने सध्या अदानीचा व्हिजिलन्स विभाग स्थानिक परिसरात भेट देत नाही. परिणामी या ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण वाढीस लागल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र अशा परिसरात वीजचोरीचे प्रकार घडत असल्याची कल्पना कंपनीला होती. त्याचमुळे वीजप्रवाह खंडित झाल्याचे कारण कंपनी देत असली तरी असा प्रकार घडल्यास ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ धोक्यात येण्याची शक्यता ओळखून त्यानुसार योग्य ती पूर्वतयारी का केलीनाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.पोलीसही झाले घामाघूम!वीजप्रवाह खंडित झाल्याचा फटका साकीनाका पोलिसांनाही बसला. बंदोबस्त करून दमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना उकाड्यामध्ये दोन तास घालवावे लागले. उकड्यामुळे रस्त्यावर उतरणाºया लोकांना पुन्हा घरात पाठविण्यासाठी भरउन्हात उभे राहावे लागले. लोक घराबाहेर बसले होते, मात्र आम्ही योग्य ती काळजी घेतल्याने रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करणाºयांना वेळीच परत पाठवून आमच्या कर्मचाºयांनी फिजिकल डिस्टन्सिंग सांभाळले. - किशोर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, साकीनाका पोलीस ठाणे

टॅग्स :वीज