Join us  

CoronaVirus एक हजार व्हेंटिलेटर खरेदीची निविदा रद्द करण्याची वेळ

By यदू जोशी | Published: April 06, 2020 6:28 AM

एकच कंपनी, पण तिचीही माघार; व्हेंटिलेटर खरेदीचा घोळ कायम

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनावरील उपचारांसाठी एक हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्याची निविदा राज्य शासनाच्या अखत्यारितील हाफकिन इन्स्टिट्यूटने काढली खरी, पण आता ती रद्द करून सुधारित निविदा काढण्याची पाळी आली आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर खरेदीचा घोळ अद्याप कायम आहे.२० मार्चला ही लघुनिविदा काढण्यात आली होती. त्यात केवळ एकाच कंपनीने एक हजार व्हेंटिलेटर पुरवण्यासाठीची ही निविदा भरली. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की आम्हाला दोन आठवड्यात व्हेंटिलेटर पुरवणे शक्य नाही, कारण बाजारात ते उपलब्ध नाहीत. आम्हाला ते जर्मनीमधून मागवावे लागतात. त्याला किमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागेल. हे आम्ही हाफकिनच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. मात्र ते निविदेतील (२आठवडे) अटीवर अडून आहेत.

एक हजार व्हेंटिलेटर पुरविण्याची एकच निविदा काढण्याऐवजी हाफकिनने विभागून निविदा काढल्या असत्या तर त्याला प्रतिसाद मिळाला असता किंवा अन्य काही राज्यांचा फॉर्म्युला स्वीकारला असता तर काही व्हेंटिलेटर निश्चितच मिळू शकले असते.या राज्यांनी संकटाची परिस्थिती लक्षात घेऊन आधीच्या आॅर्डरमध्ये पुरवठादारांनी नमूद केलेल्या किमतीवर निविदा न काढता व्हेंटिलेटर खरेदी केले. तसे अत्यंत अपवादात्मक परिस्थिती म्हणून करायला हवे होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.हाफकिनचे व्यवस्थापक आर.एन. कुंभार यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, एक हजार व्हेंटिलेटरच्या निविदेत समोर आलेल्या कंपनीने माघार घेतली आहे. त्या कंपनीने एका व्हेंटिलेटरची किंमत २५ लाख रुपये नमूद केली होती. तेवढी किंमत देणे आम्हाला शक्य नव्हते.

आम्ही वाटाघाटी करण्यास त्यांना बोलावले, मात्र त्यांनी माघार घेतली. आता आम्ही सदर कंपनीला काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस बजावली आहे. बाजारामध्ये व्हेंटिलेटर उपलब्धच नाहीत, त्यामुळे ते पुरवण्याबाबत कंपन्यांनाही मर्यादा आहेत हे कुंभार यांनी मान्य केले. मात्र निविदेत दोन आठवड्यात व्हेंटिलेटर पुरविण्याची अट होती याचा त्यांनी पुनरुच्चार केला.लघुनिविदा रद्द करण्याची पाळी आली असताना आता व्हेंटिलेटर खरेदीसाठी हाफकिन काय करणार, या प्रश्नात कुंभार म्हणाले की, आम्ही ही फेरनिविदा काढू. या निविदेच्या आधी १५० व्हेंटिलेटर पुरविण्यासाठीची स्वतंत्र निविदा काढण्यात आली होती. ज्या कंपनीला पुरवठ्याचे कंत्राट मिळाले त्या कंपनीने आतापर्यंत १८ व्हेंटिलेटर पुरवले आहेत. टप्प्याटप्प्याने ही कंपनी नजीकच्या काळात व्हेंटिलेटर पुरविणार आहे. याशिवाय देणग्यांमधून काही व्हेंटिलेटर मिळत आहेत.

टप्प्याटप्प्याने व्हेंटिलेटर...पुरवठ्याचे कंत्राट मिळालेल्या कंपनीने आतापर्यंत १८ व्हेंटिलेटर पुरविले आहेत. टप्प्याटप्प्याने ही कंपनी नजीकच्या काळात व्हेंटिलेटर पुरविणार आहे. याशिवाय देणग्यांमधून काही व्हेंटिलेटर मिळत आहेत, असे कुंभार यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस