Join us  

coronavirus: एक हजार बेडचे रुग्णालय आठवड्यात होणार, बीकेसीत युद्धपातळीवर काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 4:37 AM

धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या रुग्णांच्या विलगीकरणासाठी हे रुग्णालय कामी येणार असल्याने पालिकेच्या रूग्णालयावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) एक हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयात रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करण्यात येणार असून वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे या रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. रुग्णालय १५ मेपासून नॉनक्रिटिकल कोविड रूग्णांच्या सेवेत सुरू होणार असल्याचा विश्वास एमएमआरडीए प्रशासनाने व्यक्त केला आहे.महाराष्ट्राचा कोरोना व्हायरसच्या विरोधातला लढा हा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. एमएमआरडीएने निर्माण केलेल्या या नॉनक्रिटिकल म्हणजेच तब्येत गंभीर नसलेल्या रुग्णांसाठीच्या विलगीकरण सुविधेमुळे वैद्यकीय सेवावर पडलेला ताण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या रुग्णांच्या विलगीकरणासाठी हे रुग्णालय कामी येणार असल्याने पालिकेच्या रूग्णालयावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. बीकेसीमध्ये उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयामधल्या बेडची संख्या सध्या एक हजार आहे. यापैकी पाचशे बेडवर आॅक्सिजनची सोय असेल. गरजेनुसार पाच हजारपर्यंत वाढवता येईल. या नॉनक्रिटिकल कोविड रुग्णालयाच्या उभारणीचा पूर्ण खर्च हा प्राधिकरणातर्फे करण्यात येईल. या सुविधेच्या स्थापनेसाठी आरेखन व तांत्रिक सहाय्य ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयातर्फे सामाजिक दयित्वातून उपलब्ध करण्यात आला आहे. तिथे असलेल्या रूग्णांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी या रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबची सोय असेल, यामध्ये सर्वसाधारण रक्त तपसणी करता येईल. आरोग्य सेवा देणाऱ्या इतर संस्थांच्या धरतीवरती या रूग्णालयांमध्ये निर्माण होणाºया कचºयाची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. त्याचबरोबर इथे डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असतील आणि त्यांच्या निवाºयाची सोयसुद्धा असेल.कोरोनाचा प्रसार रोखताना वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये करोनाग्रस्तांची झालेली वाढ लक्षात घेता विलगीकरण सुविधा वाढवण्याची गरज असल्याने महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार संशयित कोविड-१९ रुग्णांसाठी हे नॉनक्रिटिकल हॉस्पिटल युध्दपातळीवर उभारण्यात येत असून १५ मे पासून ते प्रत्यक्षात रूग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई