Join us  

CoronaVirus: कोरोनाला रोखण्यास क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 4:28 PM

कालपर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

मुंबई : राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२ पथक काम करीत आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४१३, नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये २१० पथके कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जात असून. राज्यभरात सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये एकूण २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. कालपर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.मुंबई महापालिका क्षेत्र (पथकांची संख्या २९२), पुणे महापालिका (४१३), पिंपरी चिंचवड महापालिका (३८), पुणे ग्रामीण भाग (३३१), ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका(१४०), कल्याण डोंबिवली महापालिका (८२), नवी मुंबई महापालिका (१६९), उल्हासनगर(९०), रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका(६५), रत्नागिरी (५४), अहमदनगर जिल्हा (१५) व महापालिका क्षेत्र (२५), यवतमाळ (५२), नागपूर महापालिका (२१०), सातारा (१८२), सांगली (३१), पालघर जिल्ह्यातील वसई विरार (७०), सिंधुदूर्ग (१९), कोल्हापूर महापालिका (६), गोंदीया (२०), जळगाव महापालिका (३६), बुलढाणा (९४), नाशिक ग्रामिण (२८) क्षेत्रात सध्या ही सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. असा आहे कंटेनमेंट आराखडाज्या भागात कोरोनाचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तेथे क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना राबविली जात आहे. त्यानुसार बाधित रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे तीन किलो मीटरपर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. त्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून घरोघर जाऊन लोकांचे सर्वेक्षण केले जाते. सध्या राज्यात ज्या भागात एक रुग्ण जरी बाधित आढळून आला तरी देखील सर्वेक्षणाचे काम केले जात असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. असे केले जाते सर्वेक्षणकंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्या भागाचा नकाशा तयार केला जातो. त्यातील घरांची संख्या त्याची लोकसंख्या विचारात घेऊन पथके तयार केली जातात. त्यांना विभाग वाटून दिला जातो. सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळात सर्वेक्षणाचे काम केले जात असून, पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आदीबाबत माहिती घेतली जाते. लक्षणांनुसार रुग्णांची यादी तयार केली जाते. ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला दिली जाते. ज्या पथकाला जो विभाग नेमून दिला आहे त्याच पथकाने पुढील १४ दिवस दररोज सर्वेक्षण करायचे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी मोठ्या रुग्णालयाकडे त्याला पाठवतो. पथकातील सदस्यया पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, एएनएम, हिवताप निर्मूलन कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आवश्यकता भासल्यास नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश केला जातो. या पथकामार्फत सर्वेक्षणासोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे महत्वपूर्ण कामही केले जाते. शिवाय कोरोनाबाबत जनप्रबोधनचेही काम केले जाते. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांना योग्य ती माहिती द्यावी. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होईल, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस