Join us  

Coronavirus: मदत न मिळाल्यास दुकान बंदच ठेवावे लागेल; सलून चालकाची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 4:01 AM

एका बाजूला आर्थिक संकट, तर दुसरीकडे कामगार नाहीत

मुंबई : तीन महिने दुकान बंद असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेशनकार्डवर रेशन मिळते. काही नातेवाईक, मुलाच्या एका मित्राने आर्थिक मदत केल्याने घर चालत आहे. सलून सुरू करण्यासाठी किट आवश्यक आहे. पैशांची गरज आहे. पैसे न मिळाल्यास सलून बंदच ठेवावे लागेल, अशी व्यथा कांजूरमार्ग येथील सलूनचालक अर्जुन चट्टेकर यांनी व्यक्त केली.

अर्जुन चट्टेकर म्हणाले की, तीन महिन्यांपासून सलून बंद आहे. आता काही अटींसह सलून सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु भांडुप, कांजूरमार्ग लॉकडाऊन आहे. त्यामुळे ५ जुलैपर्यंत सलून सुरू करता येणार नाही. त्यातच सलूनचे तीन महिन्याचे भाडे थकले आहे. रेशनकार्डवर २० ते २५ किलो तांदूळ मिळतात, डाळ मिळते. काही नातेवाईक डाळ, तांदूळ देतात. पण हे मिळाले तर जेवणाच्या इतर खर्चासाठी पैशांची आवश्यकता असते. गावावरून आठवड्याला नातेवाइकांकडून पैसे मागवतो. मुलाचे मित्र पैशांची मदत करतात त्यावरच घर चालते, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आता सलून सुरू करायचे असेल तर पाच ते सहा हजार रुपयांची गरज आहे. त्या पैशात युज अँड थ्रो, सॅनिटायझर आणि इतर साहित्य खरेदी करता येईल. पण पैसे नाहीत. सलून मालकांचे आधीच भाडे थकले आहे. त्यांच्याकडेच पैसे मागण्यासाठी जाणार आहे. त्यांनी जर मदत केली तर ठीक अन्यथा पाच ते सहा हजारांची व्यवस्था करेपर्यंत सलून बंद ठेवावे लागेल.सलूनमध्ये कामगारांची कमतरतातीन महिन्यांनंतर आज सलून सुरू झाले आहे. पीपीई किट, युज अँड थ्रो, सॅनिटायझर आदी बाबींची तयारी करूनही कामगार नसल्याने ग्राहकांना परत पाठवावे लागले आहे. आशू ब्युटी केअरच्या मालक सुनीता बनसोडे यांनी सांगितले की, कांदिवली पूर्व परिसरात माझे युनिसेक्स सलून आहे. सलूनची पूर्ण स्वच्छता केली आहे. ५० ते ६० हजारांचे साहित्य खरेदी केले आहे. कोरोनामुळे सलूनमध्ये काम करणाऱ्या मुलींना त्यांचे पालक पाठवत नाहीत. केवळ दोन महिला येऊन आय-ब्रो करून गेल्या.सलूनमध्ये दोन कामगार काम करतात. त्यातील एक जण नालासोपारा येथे राहतो तर एक हनुमाननगर भागात राहतो. नालासोपारा येथून येण्यासाठी रेल्वे बंद आहे, त्यामुळे एक कामगार कामावरून येऊ शकला नाही. तर हनुमाननगर परिसरात जो कामगार राहतो त्या ठिकाणी रेड झोन आहे त्यामुळे तो येऊ शकला नाही. केशकर्तन करण्यासाठी सहा ग्राहक आले होते, पण कामगार नसल्याने त्यांना परत पाठवले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस