Join us  

Coronavirus: ‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 3:23 PM

गेल्या २ महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर ८ जूनपासून पुनश्च हरिओम करत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देमुंबईमध्ये आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा ५१ हजारावर गेला आहेराज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट ३ ऑगस्टपासून अधिवेशनाला सुरुवात होणार, ४ दिवस चालणार सत्र

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं भारतात थैमान घातलं आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजाराहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७ हजाराहून जास्त लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची सर्वाधित संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात जवळपास ९० हजारांपर्यंत कोरोनाबाधित आढळले आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने १९ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले होते, गेल्या २ महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर ८ जूनपासून पुनश्च हरिओम करत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन ठरवण्यासाठी आज विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार यंदा अधिवेशनाचा कालावधी कमी करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ३ ऑगस्टपासून सुरु होईल, तसेच हे अधिवेशन फक्त ४ दिवस चालेल असं सांगण्यात येत आहे. मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच सरकारी अधिकारी, कर्मचारी, आमदार यांना एकत्र आणून हे अधिवेशन कसं करायचं यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

राज्यात विधानसभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ७८ आमदार आहेत, अधिवेशनासाठी विधान भवन तसेच मंत्रालयातील कर्मचारी अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित असतात, मात्र यंदाचं अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा वेगळं असणार आहे, कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने अधिवेशनाचं स्वरुप, कालावधी या सर्व गोष्टी बदलणार आहेत.

मुंबईमध्ये आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा ५१ हजारावर गेला आहे. तर कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या वुहानमध्ये एकूण ५० हजार ३४०  रुग्ण सापडले होते. या आकडेवारीनुसार चीनच्या वुहानला मुंबईने मागे टाकले असून देशातील असे शहर बनले आहे जिथे सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे आज मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५१ हजारावर जाऊन पोहोचली आहे.

मुंबईमध्ये सोमवारी एकाच दिवसात ६४ मृत्यू झाले होते. तर राज्यभरात १०९ रुग्णांनी जीव गमावला होता. मुंबईनंतर देशाची राजधानी दिल्लीचा नंबर लागतो. तिथे २९ हजार ९४३ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. दिल्लीमध्येही ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरात मध्ये ३१, तामिळनाडूमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसविधान भवनमुंबईराज्य सरकार