Join us  

Coronavirus: कोरोना संसर्ग संक्रमणाचा कल तपासणारे सेरो सर्वेक्षण; तीन वॉर्ड लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:49 AM

चेंबूर, वडाळा, दहिसर या विभागात महापालिकेची मोहीम

मुंबई : कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग पडताळण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या सूचनेनुसार महापालिकेने यापूर्वी पाचशे व्यक्तींचे सर्वेक्षण केले होते. या मोहिमेअंतर्गत आता बिगरशासकीय संस्थांच्या सहकार्याने एम पश्चिम (चेंबूर, टिळक नगर), एफ उत्तर (सायन-वडाळा) आणि आर उत्तर (दहिसर) या तीन विभागांमध्ये सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला आहे. त्यानुसार कोविड दोन संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई आणि इतर संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या चेंबूर, सायन, वडाळा, दहिसर या विभागांची निवड करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणासाठी झोपडपट्टी व अन्य भागांतून १२ वर्षे वयोगटात वरील व्यक्तींचे एकूण दहा हजार रक्ताचे नमुने संकलित करण्यात येणार आहेत. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि बिगरशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांचा समवेश असलेले पथक स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने निवडक घरातील मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय माहिती, संपर्कातील व्यक्तींचा इतिहास आणि इतर आजार असल्याची माहिती एकत्रित करणार आहेत.झोपडपट्टी विभाग व अन्य विभागातून रक्ताचे नमुने एकत्रित करून कस्तुरबा सुष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये तसेच फरिदाबाद ट्रान्सलेशन विज्ञान औद्योगिक संस्थान यांच्याकडे पाठवून अँटिबॉडीज निदान करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून संक्रमणाची बाधा होणे, संक्रमणाचा प्रसार जनतेमध्ये कशा रीतीने झाला आहे याबद्दलची माहिती प्राप्त होऊ शकेल. ही माहिती धोरणात्मक निर्णयासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस