Join us  

Coronavirus : वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सोशल डिस्टन्सिंग आवश्यकच, साथीच्या रोगांवर ज्येष्ठांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 3:50 AM

राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या खबरदारीसोबत वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत गर्दी टाळण्याचे आवाहन लोकांना केले आहे. राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या खबरदारीसोबत वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे. कोरोनाचे राज्यावरचे साथीच्या रोगाचे सावट हे काही पहिलेच आहे असे नाही. याआधी प्लेग, कॉलरा, देवी, इबोलासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव राज्यात, देशात आणि जगात झाला आहे. तेव्हाच्या सरकारने आणि नागरिकांनी या आजारांचा आणि उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना कसा केला हे जाणून घेताना घेतलेल्या आढाव्यात वैयक्तिक स्वच्छता, प्रतिकारशक्ती वाढविणे आणि सोशल डिस्टन्सिंग हेच उपाय प्रामुख्याने असल्याचे समोर आले.१८९६ मध्ये प्लेगची साथ पसरली होती तेव्हाही सावधगिरी बाळगणे आणि स्वच्छता राखणे यासह दूर कुठेतरी जाऊन राहणे हाच उपाय केला जात असल्याची प्रतिक्रिया रामचंद्र गव्हाणे यांनी दिली. चारकोपच्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरील ग्रुपमध्ये सामील आपल्या काळातील साथीच्या रोगांवर त्या काळी काय उपाय केले हे सांगताना त्यांनी ही माहिती दिली.इतक्या वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर असा साथीचा रोग आला नव्हता. त्या काळी आम्ही मोठे नसलो तरी आमचे आईवडील आम्हाला घ्यायला लावत असलेली खबरदारी आम्ही आजही विसरलो नसल्याचे ते सांगतात. त्या वेळी त्यावर औषध उपलब्ध नव्हते आणि झालेच असेल तर आम्हाला माहीत नव्हते. त्यामुळे गावातील घर सोडून शेतातील घरावर काही दिवस मुक्काम केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतरही पुन्हा एकदा प्लेगची साथ आली त्या वेळी घाटकोपरच्या बेस्ट कॉलनीमध्ये राहणाºया जयवंत रेडकर यांनी आपले अनुभव सांगितले. त्याला नियंत्रित करण्यासाठी त्या वेळी तेथील नागरिकांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली.मृत पाळीव प्राण्यांची विल्हेवाट लावण्याचा कसा प्रयत्न केला हे त्यांनी नमूद केले. सोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने वैयक्तिकआणि सार्वजनिक स्वच्छतेच्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.देवीची साथही होती धोकादायकदेवीच्या साथीमध्ये देवीची लस उपलब्ध असल्याने धोका जाणवला नाही. मात्र ती परिस्थितीही भयंकर असल्याचे वर्णन यशोधरा सामंत यांनी केले. त्या वेळी चौथी इयत्तेत असणा-या यशोधरा यांनी शाळेतून लसीकरण करण्यासाठी कसे बंधनकारक करण्यात आले होते त्याचे वर्णन केले.त्या वेळीही वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व घरी आणि शाळेतून सांगितले जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे, हे त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसहेल्थ टिप्स