Join us  

CoronaVirus: यंदा मक्केतील हज यात्रेवरही गंडातर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 5:55 AM

सौदी सरकार ईदनंतर घेणार निर्णय; भाविकांना अद्याप आशा

- जमीर काझी ।मुंबई : कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका यावर्षी आॅगस्टमध्ये होणाऱ्या हज यात्रेला बसणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. यात्रेवरच गंडांतर येणार असून त्याबाबत सौदी सरकार रमजान ईदनंतर निर्णय जाहीर करणार आहे, असे सौदी दूतावासातील सूत्रांकडून सांगण्यात आले. भाविकांना मात्र हजपर्यंत सर्व परिस्थिती आटोक्यात येऊन यात्रा सुरळीत होईल, अशी आशा आहे.दरवर्षी इस्लामी जिल्हज महिन्यात होणाºया हजचा मुख्य विधी यात्रा यंदा आॅगस्टच्या सुरुवातीला येत आहे. दरवर्षी जगभरातून कोट्यवधी भाविक जमा होतात. भारतातून पावणेदोन लाखावर भाविक सहभागी होतात. हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने सव्वा लाख भाविकांना पाठविण्यात येते. सौदी अरेबियात मक्का मदिना येथे बकरी ईदवेळी होणाºया हज यात्रेवर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दाट काळे ढग पसरले आहेत. विषाणूच्या वाढत्या विषाणूमुळे २७ फेब्रुवारीपासून उमरा यात्रा स्थगित केली आहे. त्यासाठी सर्व जगभरातील प्रवाशांना दिलेले व्हिसा निलंबित केले आहेत. हज यात्रेचा कालावधी जवळ येत आहे. मात्र, जगभरातूनच कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्याची तयारी आवश्यक असताना लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प असल्याने यंदा हज यात्रेलाही स्थगिती देण्याच्या निर्णयाप्रत सौदी सरकार पोहोचले आहे. मात्र, येत्या २५ एप्रिलपासून रमजानचे रोजे सुरू होत असल्याने महिनाभर परिस्थितीवर लक्ष ठेवून ईदनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे दूतावासातील सूत्रांकडून सांगण्यात आले.हज यात्रेबद्दल अद्यापही सकारात्मकआम्ही सौदी सरकारच्या सातत्याने संपर्कात आहोत, रमजान ईदनंतर त्याच्याकडून अधिकृत जाहीर केले जाईल. आम्ही सकारात्मक असून त्यासाठीची तयारी वेळेत पूर्ण करू. दुर्दैवाने यात्रा रद्द झाल्यास भाविकांनी भरलेली रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. सर्व रक्कम बँकेत सुखरूप आहे.- डॉ. मकसुद खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी आॅफ इंडिया

टॅग्स :रमजान ईदसौदी अरेबिया