Join us  

coronavirus: कोरोना पॉझिटिव्ह मातांची सुखरूप प्रसूती; ३७० जणींना मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 2:09 AM

नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४०८ कोरोना पॉझिटिव्ह मातांनी ४१२ बाळांना जन्म दिला. या मातांनी जन्म दिलेल्या बाळांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 मुंबई : महापालिकेच्या नायर रुग्णालयात सर्वाधिक कोरोना निगेटिव्ह बाळांचा जन्म झाला आहे. नायर रुग्णालयात जन्म घेतलेल्या तब्बल ४१२ नवजात बालकांनी आई कोरोना पॉझिटिव्ह असूनही कोरोनावर मात केली आहे.नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४०८ कोरोना पॉझिटिव्ह मातांनी ४१२ बाळांना जन्म दिला. या मातांनी जन्म दिलेल्या बाळांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी ३७० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहितीही रुग्णालयातून देण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून आतापर्यंत एकूण ४०८ कोरोना पॉझिटिव्ह माता नायर रुग्णालयात वेगवेगळ्या कारणांनी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी काहींची प्रसूती झाली असून काही उपचार घेत आहेत. नायर रुग्णालयातच काही दिवसांपूर्वी २०० कोरोना निगेटिव्ह बाळांनी जन्म घेतला होता. मात्र, आता ही संख्या वाढली असून ती ४१२वर पोहोचली आहे.मातांनी बाळांना जन्म दिल्यानंतर या बाळांची कोरोना चाचणी केली गेली. मात्र, या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ही दिलासादायक बाब नायर रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा मलिक यांनी दिली आहे. आतापर्यंत वयोवृद्ध, गर्भवती महिला, दीर्घ आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नायर रुग्णालयात जन्म घेतलेली बालके कोरोना निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, आतापर्यंत कोणत्याही रुग्णालयात एवढ्या कोरोना निगेटिव्ह बाळांचा जन्म झाला नसल्याचा दावाही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. वैद्यकीय अभ्यासानुसार, नायर रुग्णालयात जगातील इतर रुग्णालयांपेक्षा सर्वाधिक निगेटिव्ह बाळांचा जन्म झाला आहे.1४०८ मातांनी ४१२ बाळांना जन्म दिला. त्यात सात जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली. त्यात आधी १५ बालके कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यांची सर्वांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात ती बालके कोरोना निगेटिव्ह आली. मात्र, त्या बाळांना हाताळल्यानंतर त्यांना संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार केले गेले. ती सर्व बालके डिस्चार्ज देण्याआधी निगेटिव्ह आली आहेत.2मातेने बाळाला हाताळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. बाळ आधी निगेटिव्ह आले तरी ते हाताळण्यातून पॉझिटिव्ह येऊ शकते. गर्भात किंवा दूध प्यायल्यानंतर बाळाला संसर्ग होत नाही, अशी माहिती डॉ. मलिक यांनी दिली.सर्वाधिक निगेटिव्ह बाळांचा जन्मसंपूर्ण खबरदारी आणि काळजी घेऊनच या मातांची प्रसूती केली गेली आहे. जन्माला आलेल्या बाळांपैकी एकूण ३०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह मातेची प्रसूती करणे हे खूप कठीण कार्य असते. यात सर्वाधिक यश हे निवासी डॉक्टरांचे आहे. आतापर्यंत रुग्णालयात सर्वाधिक बाळांनी जन्म घेतला आहे, असे नायर रुग्णालय प्रसूती विभाग कोविड-१९ विभागाचे नोडल अधिकारी डॉ. नीरज महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई