Join us  

CoronaVirus निर्दयी बहिणीने भावाला वाऱ्यावर सोडले; एका चाळीच्या खोलीत कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 11:00 PM

दहिसरच्या कांदरपाड्यातील घटना

- मनोहर कुंभेजकरमुंबई : कोरोना झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना घरातच किंवा हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन केले जाते. मात्र, निर्दयी बहिणीने भावाला वाऱ्यावर सोडून एका चाळीच्या खोलीत क्वारंटाईन केल्याची घटना दहिसरच्या कांदरपाड्यात आज समोर आली. म्हात्रे चाळीत भावाला महिलेने रुग्णवहिकेतून आणून सोडले आणि ती चक्क निघून गेली, अशी माहिती या चाळीतील नागरिकांनी दिली.

भावाला ताप आणि कफ होता, असे त्याच्याकडे असलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या येथील नागरिकांनी पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक २ च्या स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला.  त्यांनी लगेच दहिसर पोलिसांशी आणि आर उत्तर सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला.

विशेष म्हणजे टाकून दिलेल्या या भावाला जेवण कोण देणार? चाळीत सामुदायिक शौचालय असल्याने त्याला येथे कोण नेणार असा सवाल शीतल म्हात्रे यांच्यासह येथील नागरिकांना देखील पडला आहे. पोलिसांनी त्याच्या बहिणीशी संपर्क साधला. तू भावाला एकटे कशी टाकून गेली असे विचारले. पण आपको क्या करने का है वह करो, अशी उडवाउडवीची उत्तरे त्या बहिणीने दिल्याचे म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. अखेर पालिकेची रुग्णवाहिका बोलावून तिच्या भावाला पोलिसांच्या आणि पालिका डॉकटरांच्या सल्ल्यानुसार बोरिवली पश्चिम येथील भगवती हॉस्पिटला दाखल केले. 

दरम्यान,  बहिणीशी संपर्क साधला असता त्या फोनवर आल्या नाही. त्यांची मुलगी फोनवर आली. या मुलीने सांगितले की, मामाला आम्ही दोन वेळचे जेवण देऊ असे त्याच्या शेजारच्यांनी सांगितले. म्हणून आम्ही त्याच्या घरी आणून सोडले. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट देखील निगेटव्हीव आला असून त्यांना बरोबर आम्ही औषधे देखिल दिली आहेत. चाळीतील नागरिकांना मामाने शौचालय वापरण्यावर आक्षेप असल्याचे आम्हाला आता समजले, असेही तिने सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या