Join us  

Coronavirus : देशांतर्गत विमानातून प्रवासासाठी नियमावली, पूर्ण वेळ मास्क लावणे अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:05 PM

मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी जे प्रवासी ‘कोविड १९’ प्रभावीत देशांमधून आले असतील व सी गटात (कमी धोका) असतील, त्यांना होम कॉरंटाइन अनिवार्य करण्यात आले आहे.

मुंबई : होम कॉरंटाइनचा सल्ला दिलेल्या प्रवाशांना त्यांच्या घरी जाण्यासाठी देशांतर्गत विमानाचा वापर करताना प्रशासनाने नियमावली जारी केली असून, त्या नियमावलीप्रमाणेच या प्रवाशांना विमान प्रवास करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विमान कंपन्यांनी या निर्देशांचे कठोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.मुंबईविमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी जे प्रवासी ‘कोविड १९’ प्रभावीत देशांमधून आले असतील व सी गटात (कमी धोका) असतील, त्यांना होम कॉरंटाइन अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या चीन, कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इराण, दुबई, कतर, ओमान, कुवेत, अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया या देशांमधून आलेल्या प्रवाशांना सक्तीचे होम कॉरंटाइन करण्यात येत आहे.देशांतर्गत प्रवास करताना या प्रवाशांनी पूर्ण वेळ मास्क लावणे अनिवार्य असून, त्यांनी सोबत स्वघोषणापत्र बाळगणे सक्तीचे आहे. या प्रवाशांना सर्वात शेवटी विमानात बसविण्यात यावे व सर्वात अगोदर खाली उतरविण्यात यावे. प्रवाशांसोबत त्यांचा संपर्क होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, विमानाच्या पुढील भागात त्यांना आसन देण्यात यावे, या प्रवाशांच्या पुढील एक आसन रिक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांना घरी पाठविण्यासाठी खासगी बसची व्यवस्था करण्याचे व स्वेच्छेने जी हॉटेल रूम उपलब्ध करून देतील, त्यांचे व्यवस्थापन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईविमानतळ