Join us  

CoronaVirus: संकटकालीन परिस्थितीत मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 12:05 AM

शासनास सर्वोतोपरी मदत करण्यासाठी विद्यापीठाची तयारी

मुंबई- देशासह राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. शासनाच्या या प्रयत्नांना साथ देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला असून शासनास सर्वोतोपरी मदत करण्यास विद्यापीठाने तयारी दर्शवली आहे. तशा आशयाचे पत्र मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी व कोरोना बाधीत व संक्रमित व्यक्तींच्या विलगीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता लागणार असून विद्यापीठाच्या ताब्यातील वसतिगृहे, गेस्ट हाऊसेस, आयटी-पार्ट इमारत, भाषा भवन इमारतीची जागा विलगीकरणासाठी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याचबरोबर संविधानिक पदांवरील व्यक्तींचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

या संकटकालीन परिस्थितीतही आपली जबाबदारी व कर्तव्ये पार पाडणाऱ्या विद्यापीठातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रुपये १० हजार प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असून त्यांना विम्याचे सरंक्षण देण्याचीही बाब विद्यापीठाच्या विराचाधीन असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. याचबरोबर विद्यापीठातील आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करत, थर्मल मशिन, एन-९५ मास्क अशा अत्यावश्यक सोयी-सुविधांसह, वसितीगृहातील विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था व इतर अनुषंगिक बाबींना प्राथमिकता दिली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई विद्यापीठ