Join us  

CoronaVirus: रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी चाळिशीपार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 1:27 AM

रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ आता २.३० टक्क्यांवरून १.७२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तसेच बहुतांशी विभागांमध्ये रुग्णसंख्या अडीच महिन्यांनंतर दुप्पट होत आहे. 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या मोहिमेत महापालिकेने मोठी झेप घेतली आहे. मुंबईत बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी गेल्या १० दिवसांत ३० वरून ४१ दिवसांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ आता २.३० टक्क्यांवरून १.७२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तसेच बहुतांशी विभागांमध्ये रुग्णसंख्या अडीच महिन्यांनंतर दुप्पट होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवसांतच रुग्णसंख्या दुप्पट होत होती. बाधित रुग्णांचा व त्यांच्या नातेवाइकांचा शोध सुरू झाल्यानंतर १५ एप्रिल रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पाच दिवसांवर पोहोचला. तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा कालावधी १० दिवस, २ जून रोजी २० दिवस आणि १६ जून रोजी ३० दिवसांपर्यंत वाढला. मे महिन्यात आठ सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक, ‘चेस दि व्हायरस’ मोहिमेंतर्गत बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील १५ लोकांचे क्वारटाईन, प्रभावी औषधोपचार, निर्जंतुकीकरण मोहीम यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली. जेणेकरून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ४१ दिवसांवर तर २४ पैकी १७ वॉर्डमधील दैनंदिन वाढ दोन टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.>काही हॉटस्पॉट विभागांची कामगिरीसांताक्रुझ, खार आणि वांद्रे पूर्व हे परिसर असलेल्या एच पूर्व विभागाने कोरोना वर मात केली आहे.  विभागातील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल ९७ दिवस म्हणजे तीन महिन्यांनी येथे रुग्ण दुप्पट होत आहेत. सायन, माटुंगा, वडाळा या एफ उत्तर विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९१ दिवसांचा आहे. तर भायखळा, मुंबई सेंट्रल, नागपाडा या ई विभागात ७६ दिवसांनी रूग्ण दुप्पट होत आहेत. एल म्हणजेच कुर्ला विभागात ७३ दिवस आणि फोर्ट-कुलाबा परिसर असलेल्या ‘ए’ विभागात ६९ दिवसांनी रुग्ण दुप्पट होत आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस