Join us  

coronavirus: पनवेलमध्ये पुस्तक वाटपासाठीमुलांना बोलावले शाळेत , महापालिका शाळेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 1:04 AM

गुरुवारी पनवेल महापालिका शाळा क्र. २ हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेने विद्यार्थ्यांना बोलावून पुस्तके वाटप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी केली होती.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु पनवेल परिसरातील शाळेकडून या नियमाला बगल देत विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. गुरुवारी पनवेल महापालिका शाळा क्र. २ हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेने विद्यार्थ्यांना बोलावून पुस्तके वाटप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी केली होती. पनवेल परिसरातील ही दुसरी घटना आहे. या कोरोना संसर्ग काळात शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. पनवेल महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पनवेल परिसर रेड झोन आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीच्या जवळपास आहे. या अनुषंगाने पनवेल मनपा परिसरातील तसेच जिल्हा परिषद शाळा अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत.शाळा सुरू करण्यासाठी शासन द्विधावस्थेत आहे. कोरोनाच्या काळात विद्यर्थ्यांना शाळेत येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. तरीसुुद्धा पनवेल परिसरातील शाळेकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. गुरुवारी पनवेल महापालिका क्र. शाळा २ हुतात्मा हिवरे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेत सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करून पुस्तके घेण्यास बोलावण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तकांचे वितरण केले जाते. ही पुस्तके घेण्याकरिता पालक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. सॅनिटायझरचाही उपयोग करण्यात आलेला नाही. या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना बोलावलेच कसे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. शाळेकडूनच बेफिकीरी दाखविली जात आहे. मुलांना शाळेत बोलावून त्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. यानंतर पुस्तके मिळतील की नाही यामुळे आपण आपल्या पाल्यासोबत शाळेत आलो असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.शासनाच्या आदेशाला दाखवली केराची टोपलीकोरोनाच्या काळात शाळा सुरू करणे तसेच विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावणे शासकीय आदेश असताना शाळेकडून सर्रास मुलांना शाळेत बोलावले जात आहे. ३ जुलै रोजी कोळखे येथील बेथनी कॉन्व्हेंट शाळेने १ली ते ७वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याची घटना घडली होती.तर गुरुवारी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून पुस्तके वाटप करण्यात आल्याची ही पनवेल परिसरातील दुसरी घटना आहे.पनवेल येथील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केल्याबाबत मला माहिती नाही. कोरोनासंदर्भात मी कामात व्यस्त आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने पुस्तके वाटप केले असेल तर योग्य ती चौकशी केली जाईल.- ए. एस. काझी, महापालिका शाळा केंद्र प्रमुख

टॅग्स :शिक्षण क्षेत्रशाळानवी मुंबई