Join us  

Coronavirus: दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवाशी मुंबईत, आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीमुळे चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 5:40 AM

Corona virus in Maharashtra: कोविडचा नवा प्रकार ओमायक्रॉनने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यात मागील १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची बाब उजेडात आली आहे.

मुंबई : कोविडचा नवा प्रकार ओमायक्रॉनने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यात मागील १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची बाब उजेडात आली आहे. अशा सर्व प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची विचारपूस केली जात असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिली.

युरोप, दक्षिण आफ्रिका अशा काही देशांमध्ये कोविडचा प्रसार पुन्हा एकदा वाढला आहे. दक्षिण आफ्रिका व अन्य काही देशांमध्ये ओमायक्रॉन हा घातक विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात सोमवारी दुपारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ठाकरे यांनी माहिती दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० नोव्हेंबरपासून मुंबईत मागील १९ दिवसांच्या कालावधीत एक हजार प्रवाशी आले आहेत. या सर्व प्रवाशांचा संपर्क क्रमांकाची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जाणार आहे. तसेच यापैकी मुंबईमधील नागरिक किती? त्यांना क्वाॅरण्टाइन करण्याची गरज आहे का? संशयित व्यक्तींच्या संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे. याबाबत केंद्र सरकारचे निर्देश आल्यास त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लसीकरण हाच उपाय...मुंबईत आतापर्यंत १०२ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यापैकी दोन टक्के मुंबईबाहेरील नागरिक आहेत, तर ७२ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. १५ जानेवारी २०२२ पर्यंत संपूर्ण मुंबईकरांचे दोन्ही डोस देऊन पूर्ण करू, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

काळजी घ्या..लसीकरण पूर्ण करता यावे, यासाठी केंद्र सरकारकडे लसीकरणामधील कालावधी कमी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तरीही कोरोनाच्या नव्या विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी मास्क घालावे, सुरक्षित अंतर पाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईआदित्य ठाकरे