मुंबई : धारावीत रविवारी २० नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे येथील रुग्णसंख्या १३८वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील ३४ बाधित क्षेत्रांमध्ये संशयित रुग्णांना शोधण्याची मोहीम तीव्र केली आहे.धारावी परिसरात दररोज १५ ते २० कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. यामुळे या परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण आहे. कल्याण वाडी, मुस्लीम नगर, मदिना नगर, मुकुंद नगर, सोशल नागर ही पाच ठिकाणे धारावीतील हॉटस्पॉट ठरली आहेत. या बाधित परिसरांना सील केल्यामुळे तब्बल ५० हजार नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.धारावीतील कल्याण वाडी, मुकुंद नगर, शक्ती नगर, राजीव गांधी चाळ, नाईक नगर या परिसरातून रविवारी २० नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने धारावी परिसरात मिशन धारावीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, फिवर कॅम्पचे आयोजन केले आहे. या कॅम्पच्या अंतर्गत ११ ते १८ एप्रिल २०२० या काळात ४० हजार लोकांची तपासणी करण्यात आली. पालिकेची १७ आणि २४ डॉक्टरांची पथके येथे कार्यरत आहेत.
CoronaVirus: हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या १३८वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:20 IST