Join us  

Coronavirus: कुठलिही विशेष रेल्वेगाडी  सोडण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 6:19 AM

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने यापूर्वी देशभरात २१ दिवस लॉकडाऊन केलं होतं. मात्र लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यानंतर रेल्वेनेही ३ मेपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचं जाहीर केले. त्यामुळे १५ एप्रिल ते ३ मे दरम्यान देशभरात ज्या लोकांनी रेल्वेचे तिकिट बुक केले आहेत, त्यांचे बुकिंग आता रद्द केले जाणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेने परिपत्रक काढून आणि ट्विट करुन कुठलिही विशेष रेल्वे चालविण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे, रेल्वेकडून अडकलेल्या मजूरांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने यापूर्वी देशभरात २१ दिवस लॉकडाऊन केलं होतं. मात्र लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान ट्रेनच्या तिकिटांचे बुकिंग सुरू होते. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा रेल्वेचा प्रवास सुरू करता येईल, अशी लोकांना आशा होती. लॉकडाऊन दरम्यान ३९ लाख रेल्वे तिकीट बुकींग करण्यात आले होते पण लॉकडाऊन वाढविल्यानंतर रेल्वेने मंगळवारी 3 मे पर्यंत सर्व प्रकारच्या प्रवासी सेवाच रद्द केल्या नाहीत तसेच या काळात केलेले बुकिंगही रद्द केले.  

मुंबईतील वांद्रा स्टेशनजवळ, वांद्रे येथील परप्रांतीय मजुरांचा आक्रोश पाहायला मिळाला. जवळपास १५०० मजूर रागाच्या भरात वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर जमा झाले होते. सोमवारी ४ वाजताच्या सुमारास जवळपास १५०० परप्रांतीय मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी एकत्र जमले होते. त्यांना घरी जाण्याची आतुरता होती. मात्र, लॉकडाऊन वाढल्यानं असंतोष त्यांच्यात उत्पन्न झाला आणि हा उद्रेक झाला, असे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. मात्र, एका वृत्तवाहिनीच्या बातमीमुळे हे मजूर गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे जमले होते, अशी चर्चा सोशल मीडियावर पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळसदृश्य परिस्थीती निर्माण झाली होती. त्यावर, आता रेल्वेकडू कुठलिही विशेष गाडी सोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.   

दरम्यान, ज्यांनी रेल्वेचे तिकीट आरक्षित केले आहे त्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत मिळेल. तिकिटांची रक्कम प्रवाशांच्या खात्यावर परत येईल. त्याचबरोबर काउंटरद्वारे बुकिंग करणार्‍यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे. संपूर्ण परतावा स्वयंचलितपणे त्यांच्या ऑनलाईन ग्राहकांना देण्यात येईल, तर ज्यांनी काऊंटरवरुन तिकीट काढले आहे अशांनी ३१ जुलैपर्यंत परतावा घेऊ शकतात असं रेल्वेने म्हटलं आहे. 

टॅग्स :रेल्वेमुंबईकोरोना वायरस बातम्यावांद्रे पूर्व