Join us  

CoronaVirus News: दिवसभरात कोरोनाच्या ६ हजार ८०० चाचण्या; प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 1:13 AM

आतापर्यंत मुंबईत ४ लाखांहून अधिक चाचण्या

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरुवातीपासूनच अधिकाधिक चाचण्यांवर भर दिला असून, आतापर्यंत मुंबईत ४ लाख ४३ हजार चाचण्या केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक चाचण्या म्हणजे खंबीरपणे संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवून पालिका प्रशासनाने चाचण्या करण्यावर भर दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करून चाचण्या केल्या आहेत. मुंबईत ३ फेब्रुवारीला पहिली कोरोना चाचणी करण्यात आली, तर ११ मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला. ३ फेब्रुवारी ते ६ मे, २०२० पर्यंत १ लाख चाचण्या झाल्या, तर १ जूनला २ लाख चाचण्या झाल्या. २४ जूनपर्यंत ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. आजपर्यंत ४ लाख ४३ हजार ८३ चाचण्या झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मार्गदर्शक नियमांमध्ये बदल 

चाचण्यांची संख्या वाढवताना त्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही पालिका प्रशासनाने सुयोग्य बदल केले. आता मुंबईतील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच ‘प्रीस्क्रिप्शन’ शिवाय कोरोना चाचणी करण्याची परवानगी दिली. सोबतच रुग्णालयांमध्ये क्षमता वाढ, तात्पुरती रुग्णालये,  आॅक्सिजन व आयसीयू उपचार आदी सुविधा पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या.

अँटिजेन चाचण्यांमुळे वाढला वेग

पालिका प्रशासनाने अर्ध्या तासात निदान करू शकणाऱ्या अँटिजेन टेस्ट युद्धपातळीवर खरेदी करून चाचण्यांना अधिक वेग दिला आहे. सुमारे १ लाख अँटिजेन चाचणी यामुळे होणार आहेत. काही दिवसांपूर्वी असलेली दैनंदिन सरासरी ४ हजार चाचण्यांची संख्या आता वाढली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई