Join us

CoronaVirus News: रुग्णांकडून होम क्वारंटाइनचे काटेकोर पालन व्हायला हवे- नगरविकासमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:18 IST

पालिका, नगरपरिषदांना निर्देश

मुंबई :  कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याऐवजी होम क्वारंटाइन होण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, होम क्वारंटाइनचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे उलट कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांकडून होम क्वारंटाइनच्या नियमांचे काटेकाेर पालन होईल, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यावी, तसेच टेस्ट आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांना दिले.एकनाथ शिंदे यांनी साेमवारी अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील महापालिका आणि नगर परिषदांची बैठक साेमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतानाच होम क्वारंटाइन रुग्णांचे ट्रॅकिंग करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करून रुग्णांचे नियमित ट्रॅकिंग करण्याचे आदेश त्यांनी सर्व महापालिका आणि नगरपालिकांना दिले. रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर येथे कुठल्याही प्रकारची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वाढीव बेड्सचे नियोजन करावे, याशिवाय ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.सर्व केंद्रांचे फायर ऑडिटसध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रुग्णालये आणि कोविड सेंटर्समधील एसी, पंखे आदी सुविधांबाबत तक्रारी न येण्याची काळजी घ्या. रुग्णांना दोन वेळचे उत्तम जेवण, नाश्ता, गरम पाणी मिळाले पाहिजे, असे सांगतानाच काही केंद्रांवर आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे सर्व केंद्रांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच, महिला रुग्णांच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.निधी कमी पडू देणार नाहीराज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोविडच्या केसेस वाढत असताना कोविडचा वाढता प्रादुर्भाव थोपवताना पालिका आणि नगरपालिका प्रशासनाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. लोकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या