Join us  

CoronaVirus News: जम्बो कोविड सेंटर खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 4:07 AM

जम्बो कोविड सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटरविषयी असलेली भावना दूर होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई : राज्य शासनाने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरपैकी काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी साधला संवाद साधला. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो, कोरोना विरुद्ध एकवटून त्याला हरवूया आणि त्यात तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असे मुख्यमंत्री म्हणाले.जम्बो कोविड सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटरविषयी असलेली भावना दूर होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही विचार मांडले. खासगी रुग्णालयांनी आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड वाढवावेत, असे अमित देशमुख म्हणाले.यावेळी ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या गीता कोप्पीकर, अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनीकचे डॉ. पी. के. ग्रांट, नागपूरच्या केअर हॉस्पिटलचे डॉ. रवि मनाडे, औरंगाबादच्या एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी, ठाण्याचे डॉ. संतोष कदम, डॉ. बिचू,डॉ. गौतम भन्साळी, डॉ. हिमांशू गुप्ता, निर्मल जैस्वाल, डॉ. सुजित चटर्जी, राजन बोरकर, डॉ. हृषीकेश वैद्य, अविनाश सुपे, डॉ. रविंद्र मोहन, महेश नार्वेकर, संतोष घाग, अमित सोमानी, निर्मल तापरिया, भाटिया रुग्णालय, नानावटी, कमलनयन बजाज, दीनानाथ मंगेशकर आदी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.छोट्या शहरांसाठी ई-आयसीयू उपयुक्तराज्य शासनाने चाचण्यांवर, उपचारांच्या दरांवर नियंत्रण आणले आहे त्याचे पालन करा. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च वाढणार नाही, याची दक्षती खासगी रुग्णालयांनी घ्यावी. छोट्या शहरांसाठी ई-आयसीयू उपयुक्त ठरणार असून त्याचा वापर वाढवा.- राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्री

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्या