Join us  

CoronaVirus News: चेंबूरमध्ये कोरोनाची लागण झालेले एक हजार रुग्ण; बाधितांपैकी ७८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:36 AM

मुंबईतील वरळी, धारावी, भायखळा, कुर्ला तसेच वडाळा या परिसरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक होती.

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईत सुरुवातीला ज्या विभागांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होती अशा विभागांमध्येही आता कारोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पालिकेच्या एम पश्चिम विभागाअंतर्गत येणाऱ्या चेंबूर परिसरात आता कोरोनाग्रस्तांची संख्या १०००च्या पलीकडे गेली आहे. तर यातील ७८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे चेंबूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुरुवातीला मुंबईतील वरळी, धारावी, भायखळा, कुर्ला तसेच वडाळा या परिसरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक होती. परंतु चेंबूर परिसरातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पालिका प्रशासनासमोर येथील संसर्ग रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

धारावीपाठोपाठ चेंबूरमध्येदेखील अनेक दाटीवाटीचे परिसर आहेत. सुरुवातीला चेंबूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. परंतु आता कोरोनाने चेंबूरच्या झोपडपट्टी परिसरातही प्रवेश केल्याने दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

चेंबूरमधील पी.एल. लोखंडे मार्गावर आतापर्यंत २००हून अधिक रुग्ण आढळले असल्याने हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. याचप्रमाणे चेंबूरच्या सिंधी कॅम्प, घाटला, लालडोंगर, सुमन नगर, सिद्धार्थ कॉलनी, सिंधी सोसायटी, कोकण नगर व शेल कॉलनी या परिसरात रुग्ण आढळले आहेत. चेंबूरच्या अनेक कोरोनाबाधित क्षेत्रांमध्ये नागरिक शिस्तीचे पालन करत नसल्याचे चित्र दिसत आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे तसेच मास्क न वापरणे या गोष्टींमुळे या परिसरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासन व पोलीस चेंबूरच्या नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई