Join us

CoronaVirus News: 'तसे' कोणतेच पुरावे नाहीत! कोरोनाच्या XE व्हेरिएंटमुळे धास्तावलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 08:43 IST

CoronaVirus News: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या स्पष्टीकरणामुळे मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला

मुंबई: देशात कोरोनाच्या XE व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाल्याचं वृत्त काल संध्याकाळी आलं. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या महिलेला XE व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मुंबईकर धास्तावले. मात्र अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार XE व्हेरिएंटचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या महिलेची चाचणी मार्चमध्ये करण्यात आली. या महिलेला XE व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं काल दिली. याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित महिलेला XE व्हेरिएंटची लागण झाल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षांची महिला चित्रीकरण करणाऱ्या टीमचा भाग होती. १० फेब्रुवारीला ती मुंबईत दाख ल झाली. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतंही लक्षण नव्हती. तिची कोविड-१९ चाचणी निगेटिव्ह आली होती. संबंधित महिलेनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. प्रोटोकॉलनुसार चाचणी करण्यात आल्यानंतर तिनं कुठेही प्रवास केला नाही. मात्र २७ फेब्रुवारीला तिला कोरोनाची लागण झाली.

२ मार्चला महिलेची आणखी एक कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तिला वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये क्वारंटिन करण्यात आलं. दोनच दिवसांत ती पूर्णपणे बरी झाली. या महिलेला XE व्हेरिएंटची लागण झाल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं. त्यामुळे मुंबईकर धास्तावले. २ एप्रिलपासून उठलेले निर्बंध पुन्हा लागू होणार की काय अशी भीती अनेकांना वाटू लागली. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या