Join us  

CoronaVirus News : बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याची मोहीम, महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 7:01 AM

१ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आतापर्यंत एकूण एक लाख ७१ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान होईपर्यंत त्याच्या संपर्कातील लोकांनाही त्याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे महापालिकेने बाधित रुग्णाच्या 'क्लोज कॉन्टॅक्ट'ला शोधण्याची मोहीम आणखीन तीव्र केली आहे. बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील दररोज किमान १४ हजार व्यक्तींना शोधून त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. १० जुलैपासून अशा सुमारे ६६ हजार ५५० लोकांना शोधून आवश्यकतेनुसार त्यांची तपासणी अथवा क्वारंटाइन करण्यात आले आहे.१ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आतापर्यंत एकूण एक लाख ७१ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेनेही चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. दररोज सुमारे १४ ते १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील लोकांचा शोधही तत्काळ घेतला जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या किमान १५ लोकांचा शोध घेण्यात येत आहे.रुग्णांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांची तातडीने चाचणी करून आवश्यकतेनुसार त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. यापैकी कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार करणे, संबंधिताच्या क्लोज कॉन्टॅक्टचा शोध घेणे अशी प्रक्रिया सुरू आहे. मात्र बाधित असूनही लक्षणे नसलेल्या व्यक्तीच्या घरी स्वतंत्र शौचालय असल्यास त्यांना घरीच क्वारंटाइन होण्याची सूट देण्यात येते.यापूर्वी दररोज सरासरी सात हजार क्लोज कॉन्टॅक्ट शोधण्यात येत होते. मात्र १० सप्टेंबरपासून दररोज १२ ते १४ हजार लोकांना शोधण्यात येत आहे.१४ सप्टेंबरपर्यंत ९ लाख चाचण्या- मुंबईत १४ सप्टेंबरपर्यंत नऊ लाख २५ हजार १४८ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.- १० ते १४ सप्टेंबर या काळात शोधण्यात आलेल्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील ६६ हजार ५५० जवळच्या नातेवाइकांपैकी ११ हजार ४८३ रुग्णांना पालिकेच्या 'कोविड केअर सेंटर-१'मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.- पालिकेच्या आरोग्य सेविका व स्थानिक स्वयंसेवक घरोघरी व झोपडपट्टीत जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. या सर्वेक्षणासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.- मोबाइल दवाखाना, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्ण आणि निकट संपर्क शोधले जात आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस