CoronaVirus News: Lemon, Orange, Citrus Extract on Corona! | CoronaVirus News: कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा; मागणी वाढली

CoronaVirus News: कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा; मागणी वाढली

मुंबई : कोरोना पासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग यासोबतच चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे देखील अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे. हल्ली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी लोक अनेक उपाय करत आहेत. 

कोणी व्यायाम, कोणी योगासने, तर कोणी आयुर्वेदिक काढा पित आहे. यासोबतच आता व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असणारी फळे खाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण असणे महत्त्वाचे मानले जाते. 

त्यासाठीच लिंबू, संत्री, मोसंबी यांचे सेवन करणे गरजेचे असते. कोरोना काळात लिंबू, संत्री, मोसंबी यांचे सेवन वाढल्याने या फळांची मागणी देखील वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे या फळांचे दर देखील वाढल्याचे चित्र फळ बाजारामध्ये दिसून येत आहे. कोरोना काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागला आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. 

२५% नी वाढले दर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. त्याच प्रमाणे मागील काही महिन्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक खर्च देखील वाढला. परिणामी बाजारपेठांमध्ये दाखल होणाऱ्या फळांच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या.

मोसंबी जालन्यातून, संत्री नागपुरातून तर लिंबू पुण्यातून
मुंबईतील बाजारपेठांमध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातून फळांची मोठ्या प्रमाणात आवक होते. परंतु संत्र्याची आवक विदर्भातून जास्त असल्यामुळे संत्री नागपुरातून तसेच मोसंबी जालना व औरंगाबाद येथून तर लिंबू पुण्यातून मोठ्या प्रमाणात दाखल होतात.

इम्युनिटी वाढते! मी फळे खातो तुम्हीही खा !!
रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून डॉक्टर व्हिटॅमिन सी च्या गोळ्या खायला सांगतात. मात्र लिंबू, मोसंबी व संत्री या फळांमधून देखील नैसर्गिकरित्या विटामिन सी मिळते. त्यामुळे मी या फळांचे नियमित सेवन करतो.     

- चैतन्य लोखंडे, शिवडी
चांगली रोगप्रतिकारक शक्ती हा कोरनावर अत्यंत रामबाण उपाय आहे. त्यासाठी आहारात प्रथिने, कर्बोदके, व्हिटॅमिन, कॅल्शियम असलेले पदार्थ असणे अत्यंत गरजेचे आहे. मी दररोज रिकाम्या पोटी लिंबू, संत्री व मोसंबी यांचे सेवन करते.    
- प्रतीक्षा निकम, टिळक नगर 

प्रती किलो दर    जानेवारी    फेब्रुवारी    मार्च    एप्रिल    
लिंबू     ५०     ६५    ७०    ८०
मोसंबी    ७०    ९०    १०५    १२०
संत्री    ३०    ३५    ४०    ४५    

तज्ज्ञ काय म्हणतात?
माझ्याकडे इलाज घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना मी नियमित काढा व व्हिटॅमिन सी असणाऱ्या फळांचे सेवन करण्यास सांगतो. लिंबू, मोसंबी, संत्री नियमित खाल्ल्याने व्हिटॅमिन सीची कमी कधीच भासणार नाही. यामुळे कोरोनापासून स्वतःचा बचाव करता येईल.      डॉ. सुयोग रत्नपारखे
लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे पचण्यास अत्यंत हलकी व त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. या काळात या पदार्थांचे सेवन करायलाच हवे. 
- छाया पाटील, डाएट कन्सल्टंट

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Lemon, Orange, Citrus Extract on Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.