Join us  

CoronaVirus News: कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये राबवणार धारावी पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 8:07 PM

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या आदेशानुसार चेस द व्हायरस व मिशन झोरो मोहिम या परिमंडळात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.आता उत्तर मुंबईतील परिमंडळ 7 च्या अख्यारितीत येत असलेल्या कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाच्या रुग्णांना लवकर शोधून काढण्यासाठी या भागात नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन सारो टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी लोकमतला दिली. या परिमंडळात आर दक्षिण,आर मध्य व आर उत्तर हे तीन वॉर्ड येतात.येथील सहाय्यक आयुक्त,आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे.

धारावी पॅटर्नच्या धर्तीवर येथील नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणे,मोबाईल स्क्रिनिंग करणे,लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करणे, कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीने प्रभावीपणे लॉकडाऊन करणे, क्वारंटाईन सेंटरची अंमलबजावणी करणे,जर इमारतीत कोरोना रुग्ण आढळला तर संपूर्ण इमारत सील करणे आदी कामे युद्धपातळीवर करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त शंकरवार यांनी दिली.

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या आदेशानुसार चेस द व्हायरस व मिशन झोरो मोहिम या परिमंडळात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. आज या परिमंडळात आर दक्षिण मध्ये 25,आर मध्य मध्ये 13 व आर उत्तर मध्ये  93 असे एकूण 131 फिव्हर शिबीर घेण्यात आली तर या परिमंडळात 155 जेष्ठ नागरिकांना ऑक्सिजनची गरज भासल्याने त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

आज दि,28 रोजी आर दक्षिण मध्ये 64,आर मध्य मध्ये 74 व आर उत्तर आदीं तीन वॉर्ड मध्ये एकूण 184 कोरोना रुग्ण आढळून आले.तर आतापर्यंत आर दक्षिण मध्ये 2440 आर मध मध्ये 2371 व आर उत्तर वॉर्ड मध्ये 1491 कोरोना रुग्ण असे एकूण 6302 कोरोना रुग्ण आढळून आले होते,तर आर दक्षिण मध्ये 1398,आर मध्य।मध्ये 958 व आर उत्तर मध्ये 587 अश्या एकूण 2943 रुग्ण कोरोनामुक्त झाले.तर आता आर दक्षिण मध्ये 910,आर मध्य मध्ये 1306 व आर उत्तर मध्ये 787 असे एकूण 3003 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.या परिमंडळात 1162 इमारती सील केल्या असून 93 स्लम क्वारंटाईन करण्यात आल्या आहेत.या परिमंडळाची सविस्तर आकडेवारी उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई