Join us  

Corona Vaccine : लसींच्या जागतिक निविदेला २५ मेपर्यंत मुदतवाढ, कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 8:44 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये १८६ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

मुंबई - केंद्रातून मर्यादित स्वरूपात लस मिळत असल्याने महापालिकेने एक कोटी लस खरेदीसाठी जागतिक पातळीवर स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागविले होते. मात्र मंगळवारी शेवटच्या दिवशी देखील या निविदेला जागतिक कंपन्यांकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ही निविदा प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये १८६ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये ७४ लसीकरण केंद्रे सुरू होती. मात्र लस उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयांतील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या काही निवडक शासकीय आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. 

पालिकेने २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक केंद्रे सुरू करीत आहे. मात्र केंद्रातून लस मिळत नसल्याने ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे महापालिकेने स्वबळावर एक कोटी लस खरेदी करण्याचा निर्णय घेत १२ मे रोजी जागतिक निविदा मागविल्या होत्या. या निविदेची अंतिम मुदत मंगळवार दि. १८ मे रोजी दुपारी एक वाजता संपली. मात्र एकाही जागतिक स्तरावरील कंपनीने लसींचा पुरवठा करण्याची तयारी दाखविलेली नाही. त्यामुळे आता २५ मे दुपारी १ वाजेपर्यंत या निविदेची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

* मुंबईत आतापर्यंत २८ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये ११ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत.

* १ मेपासून लसीकरणाच्या निर्णायक टप्प्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लस उपलब्ध नसल्याने ही मोहीम तूर्तास बारगळली आहे. 

* एक कोटी लसींचा पुरवठा करण्यास तयार होणाऱ्या कंपनीने तीन आठवड्यांमध्ये लस पुरवण्याची अट महापालिकेने घातली आहे. यामुळेच कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई